मराठवाडयातील पाणीप्रश्न आता हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. भाजपाने तशी रणनीती आखल्याचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपिनाथ मुंडे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले. पाणीप्रश्नी मराठवाडयातील राष्ट्रवादीचे आमदारही आक्रमक झाले असून पाणीप्रश्न काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
दरम्यान, जायकवाडी धरणात ९ टीएमसी पाणी देण्यासाठी नाशिकमध्ये आयोजित सोमवारच्या बैठकीत बुधवारनंतर (दि. २८) कधीही पाणी सोडण्याविषयी चर्चा झाली. पाणी सोडण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होताना पाणी मोजण्यासाठी व शेतकऱ्यांनी उपसा करू नये, यावर देखरेख करण्यासाठी दोन पथके तयार करण्यात आली आहेत. जायकवाडीत साडेचार टीएमसी पाणी आले, तरी पाणीटंचाई जाणवणारच आहे. दरम्यान, परळी औष्णिक वीज केंद्रासाठी रेल्वे वाघिणीतून पाणी देण्याचा प्रस्ताव मात्र पुरता बारगळला आहे. रेल्वेने पाणी आणणे अव्यवहार्य असल्याची माहिती ऊर्जामंत्री राजेश टोपे यांनी दिली.
जायकवाडीत पिण्यासाठी पाणी द्यायलाच हवे. याबरोबरच वीज केंद्रालाही पाणी द्यावे यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी परळीच्या औष्णिक वीज केंद्राला पाणीपुरवठा करणे शक्य नसल्याचे सोमवारी सांगितले होते. तथापि परभणीतील बंधाऱ्यात पाण्याची व्यवस्था मार्च-एप्रिलपर्यंत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि क्षमतेच्या ५० टक्केच वीजनिर्मिती शक्य आहे. भारनियमन वाढू नये, या साठी नाशिकमधील वीज प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे ठरविले जात आहे. पण फेब्रुवारीनंतर खऱ्या अर्थाने हाल होतील, हे वास्तव सरकारही मान्य करीत आहे. रेल्वे वाघिणीने पाणीपुरवठयासाठी आवश्यक त्या प्रमाणात पाणीसाठाच नाही. त्यामुळे हा मार्ग अव्यवहार्य असल्याचे सांगितले जाते. या प्रश्नी सरकाने मराठवाडयातील लोकप्रतिनिधींची विशेष बठक बोलवावी, अशी मागणीही मुंडे यांनी केली. आता पाणीप्रश्न अधिवेशनात नेण्याच्या हालचाली सुरू आहेत. तहानलेल्या मराठवाडयातील पाण्याच्या योजनांचा आढावा अधिकारी घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 27th Nov 2012 रोजी प्रकाशित
पाणीप्रश्नावर हिवाळी अधिवेशनात रणकंदन
मराठवाडयातील पाणीप्रश्न आता हिवाळी अधिवेशनात गाजण्याची शक्यता आहे. भाजपाने तशी रणनीती आखल्याचे भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपिनाथ मुंडे यांनी या संदर्भात बोलताना सांगितले. पाणीप्रश्नी मराठवाडयातील राष्ट्रवादीचे आमदारही आक्रमक झाले असून पाणीप्रश्न काँग्रेससाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.

First published on: 27-11-2012 at 02:15 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Debet on water supply problems in winter session