तीव्र पाणीटंचाई आणि गायब झालेला पाऊस यांमुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट दाटले असून अशा परिस्थितीत संपूर्ण राज्याने दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची जनतेची भावना कृतीतून व्यक्त व्हावी यासाठी राज्य सरकारने विशेष लॉटरी सोडत जारी करून त्याद्वारे उभा राहणारा निधी दुष्काळग्रस्तांच्या समस्या निवारणासाठी वापरावा, अशी मागणी करणारे एक निवेदन गिरगावातील एका लॉटरी विक्रेत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.राज्याच्या ११ कोटी लोकसंख्येचे हात दुष्काळग्रस्तांचे अश्रू पुसण्यासाठी त्यांच्यासोबत आहेत, हे या सोडतीतून जगाला दिसू द्या, असे आवाहनही या लॉटरी विक्रेत्याने केले आहे. गणेशोत्सव आणि सणासुदीचे दिवस सुरू होत असल्याने, सत्कार्य करण्याची महाराष्ट्राची मानसिकता असते. त्यामुळे, विशेष लॉटरी सोडत आयोजित करून या लॉटरीची तिकिटे खरेदी करण्यासाठी व त्याद्वारे निधी उभारून आपल्याच बांधवांचे अश्रू पुसण्यासाठी राज्यातील जनता निश्चितच पुढे सरसावेल, असा विश्वासही या निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आला आहे.लॉटरी योजनेतून समाजोपयोगी उपक्रम राबविण्याच्या अनेक कल्पना घेऊन गिरगावातील अंबोमाता लॉटरी एजन्सीचे सुरेश भगत हे विविध राजकीय नेत्यांबरोबरच मंत्रालयाचेही उंबरठे सातत्याने झिजवत असतात. अशा योजनांचा पाठपुरावाही ते करतात. कारगील युद्धाच्या वेळी सैनिक कल्याण निधी उभारणीकरिता विशेष लॉटरी सोडत सुरू करण्यासाठी त्यांनी थेट दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला व जवानांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जनतेने मोठय़ा प्रमाणात लॉटरी तिकिटे खरेदी केल्याने भरघोस निधी उभा राहिला, अशी आठवण भगत आवर्जून सांगतात. दुष्काळग्रस्त मदतनिधीसाठी लॉटरी सोडत काढण्याबाबत आपण अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचीही भेट घेतली असून लवकरच याबाबत संबंधितांची बैठक घेऊन चर्चाही करण्याचे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिल्याचे भगत यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 19th Aug 2015 रोजी प्रकाशित
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष लॉटरी सोडतीची मागणी
तीव्र पाणीटंचाई आणि गायब झालेला पाऊस यांमुळे महाराष्ट्रावर दुष्काळाचे भीषण सावट दाटले असून अशा परिस्थितीत संपूर्ण राज्याने दुष्काळग्रस्तांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे.
First published on: 19-08-2015 at 12:50 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Demand special lottery draws for help