चित्र अन् रांगोळी काढण्यात मग्न झालेला युवावर्ग.. सामूहिक नृत्यांचे बहारदार सादरीकरण.. आणि ‘देवळाली रन’मध्ये सहभागी झालेले बच्चे कंपनीसह आबालवृध्द.. देवळाली कॅम्प येथे आयोजित देवळाली महोत्सवाचे हे वैशिष्ठय़े ठरले. ‘देवळाली रन’मध्ये महिला गटात नुतन विद्या मंदिरची माधुरी काळे तर पुरूष गटात अशोक पवार यांनी पहिला क्रमांक पटकावला.
देवळाली महोत्सवाचे हे दुसरे वर्ष. विविध उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात मंगळवारी त्याची सांगता झाली. यावेळी महोत्सवात झालेल्या सर्व स्पर्धाचे पारितोषिक वितरण आंतरराष्ट्रीय खेळाडू हंसराज पाटील, अंजना ठमके व माजी खासदार राजाभाऊ गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी छावणी मंडळाच्या उपाध्यक्षा सुरेखा गोडसे, नगरसेवक हेमंत गोडसे आदी उपस्थित होते. महोत्सवात देवळाली कॅम्प परिसरातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते. चित्रकला, रांगोळी व समूह नृत्य स्पर्धेसह ‘देवळाली रन’ला मिळालेला प्रतिसाद पाहून संयोजकही सुखावले. धावपटूंचा उत्साह पाहून अंजना ठमकेने जिद्द व चिकाटीच्या जोरावर देवळालीतही दुसरी अंजना तयार होवू शकते असे नमूद केले. हंसराज पाटीलने शिक्षण आणि खेळाची सांगड घालून विद्यार्थ्यांनी प्रगती करावी, असे आवाहन केले.
नाशिक शहरात सध्या भुजबळ फाऊंडेशनतर्फे आयोजिलेल्या नाशिक फेस्टीव्हलची धामधूम सुरू आहे. त्या अंतर्गत विविध क्रीडा स्पर्धासह महिला बचत गट प्रदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम अशा भरगच्च कार्यक्रम होत आहेत. या परिस्थितीत आणि त्याच सुमारास आयोजित देवळाली महोत्सव आपले वेगळेपण दर्शविणारा ठरला.