मोठय़ा चौकटीच्या खिडकीतून दिसणारं आभाळ पाहताना त्याचा अवकाश मनात मावत नाही. दूर क्षितिजापर्यंतचा त्याचा निळाशार विस्तार आपल्याला भारून टाकतो. ते भारलेपण घेऊन मागे फिरताना स्वत:वर पडलेलं कुठलंतरी भोक नजरेस पडतं. त्या लहानशा गोलातून आत येणाऱ्या निळसर प्रकाशामुळे पुन्हा आपली नजर त्या पल्ल्याड असणाऱ्या आभाळावर स्थिरावते. पण खिडकीच्या चौकटीवर हात ठेवून आरामात मान वर करून ते विस्तारलेपण अंगावर घेता येत नाही. आता मला त्या भोकाच्या दिशेने बघण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. मी पायाच्या टाचा उंचावून बघतो, मला माझा एक डोळा हलकेच बंद करावा लागतो.. अरेच्चा इथूनही मला तेच अवकाश दिसतंय की.. चित्रपट आणि लघुपटामध्ये जर फरक असेल तर तो माझा याच दृष्टिकोनाचा आहे. वेगळे काहीतरी जाणून घेताना, समजून उमजून घेताना कराव्या लागणाऱ्या प्रयत्नांचा आहे. ‘शिप ऑफ थिसस’ चित्रपटाचा दिग्दर्शक आनंद गांधी आपल्याला लघुपटांची ओळख करून देतो ती अशी. आनंदने खरेतर आपली सुरुवात मालिकांच्या पटकथा लेखनापासून केली होती. त्याने ‘राईट हिअर राईट नाऊ’ नावाचा पहिला लघुपट केला. तो गाजला आणि त्यानंतर त्याने अवयवदानाविषयी जागरुकता निर्माण करणारा ‘शिप ऑफ थिसस’ हा चित्रपट केला. ज्यासाठी त्याला किरण रावसारख्या दिग्दर्शिकेचे पाठबळ मिळाले. आपल्याकडे सध्या लघुपट निर्मितीचे जोरदार वारे वाहू लागले आहेत. एक लघुपट करायचा आणि तो गाजला किंवा दिग्दर्शक म्हणून आपली दखल घेतली गेली की फिचर फिल्म करण्यासाठी पुढचे पाऊल टाकायचे हा नवा पायंडा पडू पाहतो आहे. दिग्दर्शक म्हणून कारकिर्द घडविताना लघुपट हे मैलाचा दगड ठरू शकतात का़़़़़़ यावर स्वत: लघुपटाकडून चित्रपट दिग्दर्शनाकडे वळलेल्या आनंद गांधीचे मत वेगळे आहे. चित्रपट दिग्दर्शनासाठी तुम्ही पहिल्यांदा लघुपट दिग्दर्शनाचा अनुभव घेतला पाहिजे अशी गरजच नसते. पण अनुभवाच्या दृष्टिने विचार करायचा झाला तर लघुपट करीत असताना चित्रपट निर्मितीची अनेक अंग, त्यातले घटक-बारकावे तुम्हाला अभ्यासायला मिळतात आणि मग फिचर फिल्म करताना तुमची काही एक तयारी आधीच झालेली असते. तुमच्यातल्या उणीवा तुम्हाला लक्षात आलेल्या असतात. नेमका कशाचा अभ्यास करायला हवा आहे हेही हुशार दिग्दर्शकाच्या लक्षात येतं. पण म्हणून मी लघुपट केला आता चित्रपटही करू शकेन असा विश्वास बाळगणं पूर्णत: चुकीचंच आहे. लघुपटाचे दिग्दर्शन ही चित्रपट दिग्दर्शनाची पहिली पायरी असते असा जो समज आपल्याकडे रूढ झाला आहे तो खोडून काढला पाहिजे.
वास्तवात सर्वोत्तम लघुपट तसेच सर्वोत्तम चित्रपट घडविण्यासाठी जे कौशल्य लागतं, जी समज लागते, माध्यमाचं भान लागतं ते पूर्णत: वेगळे आहे. म्हणून जगभरात कितीतरी उत्तम चित्रपटकर्मी आहेत ज्यांनी आयुष्यभर केवळ लघुपट निर्मिती केली, ते कधीही फिचर फिल्मकडे वळलेले नाहीत. आपण जी कलाकृती करतो आहोत त्याच्यामागचा आपला हेतू स्पष्ट असणं ही प्राथमिक गरज असल्याचे आनंद गांधी यांनी नमूद केले.
लघुपटांचा अनुभव गाठीशी घेऊन चित्रपट दिग्दर्शन करणं ही गरज नसेल तर मग सध्या तरुण चित्रपटकर्मीचा लघुपटाकडे जो ओघ वाढला आहे त्याचे नेमके कारण काय असू शकेल?
बदलत्या तंत्रज्ञानामुळे चित्रपट निर्मिती-दिग्दर्शनापासून ते छायाचित्रण, ध्वनी, संकलन अगदी अॅनिमेशन, व्हीएफएक्ससारख्या तांत्रिक घटकांचे प्रशिक्षणही घरबसल्या मिळू लागले आहे हे एक महत्त्वाचे कारण आहे. डिजिटल तंत्रज्ञानामुळे एकीकडे चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण तुम्हाला माऊसच्या एका क्लिकवर उपलब्ध झाले आहे. अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त डिजिटल कॅमेरे बाजारात सहज उपलब्ध आहेत. याचा उत्तम उपयोग करून तुम्ही जे जे कराल ते लोकांना दाखविण्यासाठी याच ऑनलाईन माध्यमांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. यामुळे सहज लघुपट निर्मिती होत असल्याचे मत आनंद गांधी यांनी व्यक्त केले. मात्र या साधनांचा उपयोग करून तुम्ही लघुपट निर्मिती केली तरी एक दिग्दर्शक म्हणून असलेलं तुमचं कौशल्य, तुमचा दृष्टिकोन, तुमच्या जाणीवा-नेणिवा या त्या लघुपटामध्ये उतरत नाहीत याचं ज्ञान तुम्हाला कुठलाही ऑनलाईन माध्यमातून होत नाही आणि उत्तम कलाकृतीसाठी मग तो लघुपट असू देत नाही तर चित्रपट असू देत तुमच्या संवेदनशीलतेचा कस लागतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तरीही एखाद्या व्यक्तीला लघुपट निर्मिती करण्याचाच ध्यास असेल तर त्यामागची नेमकी मानसिकता काय आहे यावर लघुपट असू दे की फिचर फिल्म असू दे कुठल्याही कलेचा आविष्कार जेव्हा केला जातो तेव्हा त्या व्यक्तीची सर्जनशीलता, त्याची प्रेरणा, त्याचे अनुभव, त्याच्या अडचणी आणि अडचणींवर सापडलेली उत्तरं अशा सगळ्याचे प्रतिबिंब त्या कलाकृतीत उमटते. मनात आलेले विचार कागदावर उतरविताना सहजतेने आपल्याला नेमकी गुंतागुंत लक्षात येते त्याचप्रमाणे डोक्यात आलेले छोटय़ाशा कथाबीजाचा लघुपटाच्या माध्यमातून विचार करत असताना ते अधिकाधिक निश्चित स्वरूपात उतरत जातं. तुमच्या अंतरमनातून घुसळून निघालेला असा छोटासा विचार जेव्हा अवघ्या काही मिनिटांच्या लघुपटातून पडद्यावर उतरतो तेव्हा तो थेट प्रेक्षकाला भिडतो. छोटय़ाशा बदुंकीच्या गोळीने जो परिणाम साधला जातो त्याची तुलना लघुपटांतून मिळणाऱ्या अनुभवाशी करता येईल. हीच खरी लघुपटांची ताकद आहे हे चित्रपटकर्मीनी समजून घेतले पाहिजे, असे आनंद गांधी यांनी सांगितले. लघुपट हे आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविण्यासाठी चांगले माध्यम असले तरी मुळातच तुम्हाला कलेप्रती संवेदनशीलता नसेल आणि लघुपट, अनुबोधपट किंवा फिचर फिल्म यांच्यातील फरकच ओळखता येत नसेल तर तुमची कलाकृती कमकुवत होते असे मत दिग्दर्शिका किरण राव यांनी व्यक्त केले. ‘धोबीघाट’ किंवा ‘शिप ऑफ थिसस’ सारखे चित्रपट हे लघुपट नाहीत. आणि रूढार्थाने तीन तासांच्या व्यावसायिक चित्रपटांच्या व्याख्येत बसणारेही नाहीत. परंतु, त्यातून मांडण्यात आलेले विषय इतके प्रभावी होते म्हणूनच ते लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आमिरसारख्या कलाकारानेही पुढाकार घेतला. आनंद गांधीच्या ‘शिप ऑफ थिसस’च्या प्रसिद्धिची जबाबदारी घेण्यामागे एक उत्तम कलाकृती लोकांपर्यंत पोहोचावी हेच उद्दिष्ट होते, असे किरण राव यांनी स्पष्ट केले. मुळातच लघुपट हा फिचर फिल्म किंवा संपूर्ण लांबीच्या चित्रपटाएवढाच महत्त्वाचा चित्रपट प्रकार आहे हे आग्रहाने मांडले जात आहे. दोन्ही कला प्रकारांमध्ये आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखविण्याच्या शक्यता पुरेपूर सामावलेल्या आहेत. फक्त या दोन्ही कला प्रकारांचे स्वरूप, त्यांचे नीती-नियम आणि त्यांच्या संकल्पनांमध्ये फार मोठा फरक आहे. आता ज्या पद्धतीत लघुपटांची निर्मिती केली जातेय किंवा त्यांना पाठिंबा दिला जातोय ही अगदीच सुरुवात आहे.
लघुपट ही संकल्पना आपल्याकडे लोकप्रिय आहे असे आताच म्हणणे धारिष्टय़ाचे ठरेल, असे आनंद गांधी सांगितले. आता आपल्याकडे या दोन्ही कला प्रकारांच्या वेगवेगळ्या शक्यता पडद्यावर येत आहेत. विविध प्रकारचे विषय कुठल्याही लांबीचा याचा विचार न करता, बजेटचा विचार न करता अत्यंत प्रभावीपणे पडद्यावर मांडले जाऊ लागले आहे. या स्थितीमध्ये लघुपटांनाही वेगळ्या प्रकारचे भविष्य असू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. स्पाईक ली यांच्यासारख्या जगप्रसिद्ध चित्रपटकर्मीने आपलेच सर्वोत्तम लघुपट फिचर फिल्म स्वरूपातही दिग्दर्शित केले त्यालाही लोकांची पसंती मिळाली.
आपल्याकडचेच उदाहरण घ्यायचे झाले तर सचिन कुंडलकर दिग्दर्शित ‘गंध’ या मराठी चित्रपटातील एक छोटीशी लघुकथा ‘अय्या’ या संपूर्ण लांबीच्या हिंदी चित्रपट रूपात पडद्यावर आली आणि ती सर्वांपर्यंत पोहोचली. त्यामुळे लघुपट आणि चित्रपट दोन्हीचा वेगवेगळ्या पद्धतीने विस्तार होतो आहे. नजिकच्या काळात आपल्याला लघुपटाचे आणखी विविध पर्याय उपलब्ध होऊ शकतील. मात्र, लघुपट किंवा चित्रपट ही उत्तम कलाकृती म्हणून लोकांसमोर येण्यासाठी दिग्दर्शकाचा त्यामागचा विचार हा जास्त महत्त्वाचा ठरतो हेच पुन्हा पुन्हा अधोरेखित होते.
लघुपट आणि चित्रपट या दोन्ही पटांत महद् अंतर आहे. दृकश्राव्य माध्यमातून कलाविष्कार साधणाऱ्या लघुपट आणि चित्रपट दिग्दर्शनासाठी तेवढीच मातब्बरी लागते. तुमची गोष्ट दहा मिनिटांत सांगून होते की तीन तासांत हा प्रश्नच इथे लागू नसतो. त्या गोष्टीचा ऐकणाऱ्यावर आणि पाहणाऱ्यावर काय परिणाम होतो ते महत्त्वाचे असते. गेल्या शंभर वर्षांत पूर्ण लांबीचा चित्रपट ज्याला फिचर फिल्म्स असे संबोधतो त्याने लोकांवर इतकी मोहिनी घातली की लघुपट, अनुबोधपट हे तितकेच प्रभावी असून त्याचा म्हणावा तसा प्रसार झाला नाही. मात्र, तंत्रज्ञानाच्या वादळामुळे लघुपटांचे विश्व आजमितीला विस्तारताना दिसते आहे. अनुराग कश्यपसारखे तरूण दिग्दर्शक लघुपटांच्या माध्यमातून पुढे येऊ पाहणाऱ्या दिग्दर्शकांना सर्वतोपरी मदत करताना दिसतात. करण जोहरसारख्या व्यावसायिक चित्रपटातील दिग्गजालाही बॉम्बे टॉकीज सारखा एक प्रयत्न करून पाहावासा वाटतो. तर विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतूनही लघुपटांना खास स्थान दिले जाऊ लागले आहे. हा सगळा बदल बॉलीवूडनामक चित्रनगरीत लघुपटांचे वेगळे विश्व वसवू पाहतो आहे का यातून पुन्हा काही वेगळेच सर्जनशील चित्रपटकर्मी सुचवू पाहत आहेत याचा दिग्दर्शक आनंद गांधी, किरण राव आणि चित्रपट अभ्यासकांशी बोलून घेतलेला धांडोळा…
संग्रहित लेख, दिनांक 25th Aug 2013 रोजी प्रकाशित
लघुपटांचे विश्वची वेगळे !
मोठय़ा चौकटीच्या खिडकीतून दिसणारं आभाळ पाहताना त्याचा अवकाश मनात मावत नाही. दूर क्षितिजापर्यंतचा त्याचा निळाशार विस्तार आपल्याला भारून टाकतो.
First published on: 25-08-2013 at 01:14 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different world of short films