गोंदिया जिल्हा परिषदेत रुजू झाल्यापासूनच वादाच्या भोवऱ्यात अडकलेले जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ.यशवंत गेडाम यांच्या कक्षाला आज सायंकाळच्या सुमारास त्यांच्यावर विविध भ्रष्टाचाराचे आरोप करून जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे व उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी सर्व सभापती व भाजपच्या सदस्यांसह कुलूप ठोकले.
कुलूप ठोकल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य द्वारावर पत्रकारांना माहिती देतांना जिल्हा परिषद अध्यक्षांनी सीईओ डॉ.गेडामांवर ११८ पदांच्या नोकरभरतीत घोळ करून उमेदवारांकडून पसे घेऊन त्यांना नोकरी दिली. खरेदीत घोटाळे केले, तसेच सर्वसामान्यांच्या कोणत्याही फाईलींवर पसे घेतल्याशिवाय ते स्वाक्षरी करीत नाहीत, असे आरोप करून त्यांच्या या गैरव्यवहारांची तक्रार आयुक्तांना करण्यात आली असून त्यावर त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमण्यात आली. समितीने चौकशी अहवाल आयुक्तांना सादर करूनही अशा अधिकाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. अशा सीईओंची हकालपट्टी करण्याच्या आमच्या मागणीवर गंभीरतेने विचार न केल्यामुळे आम्हाला अखेर सीईओंच्या कक्षाला कुलूप लावणे भाग पडल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे यांनी माध्यमांना सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनीही सीईओंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करून ते अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना धमकावण्याकरिता कादीर भाई नावाचे गुंड पोसत असल्याचाही गंभीर
आरोप केला, तसेच पुढील चार दिवसात सीईओंवर कारवाई
करून त्यांची हकालपट्टी केली नाही, तर संपूर्ण जिल्हा परिषद बंद पाडून तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. आरोप निराधार, कारवाई करणार -डॉ.गेडाम
माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करीत कक्षाला कुलूप ठोकणाऱ्यांची तक्रार पोलिसांकडे करणार असल्याचे, तसेच कायदेशीर मार्गाने कार्य करीत असून मी शासनाने नेमलेला अधिकारी आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षांनी माझ्यावर लावलेले सर्व आरोप निराधार असून चौकशी समिती चौकशी करीत आहे. त्यात ‘दूध का दूध और पाणी का पाणी’ होणार असल्याचे डॉ.यशवंत गेडाम यांना विचारले असता त्यांनी आपली बाजू मांडतांना सांगितले.