जिल्ह्यातील सध्या काम सुरू असलेल्या आणि प्रस्तावित जलसंपदा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. जयंत जाधव यांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. दमणगंगाव व नार-पार नद्यांचे पाणी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात आणण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.
जिल्ह्य़ातील अधिकाधिक क्षेत्र ओलिताखाली येण्याच्या दृष्टिने जलसंपदा प्रकल्पांच्या कामांना गती देण्याची गरज असल्याचे जाधव यांनी म्हटले आहे. मांजरपाडा वळण योजनेचे काम प्रगतीत असून ८.९६ कि. मी. बोगदा आणि २.७० किमी लांबीच्या उघडय़ा चराचे काम सुरू आहे. या योजनेसाठी ६८.३६ कोटी अतिरिक्त निधी आवश्यक असल्याचे निवेदनात आ. जाधव यांनी म्हटले आहे. गोळशी महाजे प्रकल्पासाठी ३.४२ कोटी, ननाशी प्रकल्पासाठी १२.४७ कोटी, हट्टीपाडा योजनेसाठी ३.८९ कोटी अतिरिक्त निधीची गरज आहे. दिंडोरी तालुक्यातील जोरण, अंबड व वणीखुर्द लघु पाटबंधारे योजनेस मंजुरी प्राप्त असून ३८.२४ अंदाजित खर्च अपेक्षित आहे. मेनमाळ व जोड उपसा योजना क्रमांक चारच्या सर्वेक्षणासाठी अंदाजे १० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित आहे.
पुणेगाव प्रकल्पासाठी २०१३-१४ मध्ये ५.५० कोटीची तरतूद करणे आवश्यक आहे. या प्रकल्पास पाच कोटी अतिरिक्त निधी मिळाल्यास एक हजार हेक्टर सिंचन क्षेत्राची निर्मिती होऊ शकेल. दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी अंदाजे पाच कोटी खर्च येऊ शकेल. ओझरखेड प्रकल्पांतर्गत वाढीव कालव्याचे काम पूर्ण करण्यासाठी १० कोटीचा खर्च अपेक्षित आहे. २०५ टीएमसी क्षमतेचे किकवी धरण प्रस्तावित आहे. या धरणातील पाण्याचा उपयोग नाशिक शहराकरिता होणार आहे.
किकवी पेयजल प्रकल्पासाठी ५२५ कोटी खर्च गृहित धरण्यात आला असला तरी या प्रकल्पाला अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. सद्यस्थितीत गंगापूर धरण समुहातून औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी आरक्षण आहे. सद्यस्थितीतील पाणी टंचाईमुळे व पिण्याच्या पाण्यास प्रथम प्राधान्य असल्याने औद्योगिक आरक्षणात तूट संभवत आहे.
वाकी धरणाचे काम ८५ टक्के पूर्ण झाले आहे. धरणाच्या उर्वरित कामांसाठी ५६ कोटीच्या निधीची आवश्यक आहे. २०१३-१४ मध्ये १३ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. सदर प्रकल्पास ४३ कोटी अतिरिक्त निधी मिळाल्यास ५२.२४ दलघमी पाणीसाठा होऊन ४६९२ हेक्टर सिंचन क्षेत्राची निर्मिती होऊ शकेल. भाम धरणाचे ४० टक्के काम पूर्ण झाले आहे. हे धरण पूर्ण करण्यासाठी ९.८४ कोटी निधीची गरज आहे. २०१३-१४ मध्ये ५५ कोटींची तरतूद प्रस्तावित आहे. प्रकल्पास ३५.८४ कोटी अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्याचे आ. जाधव यांनी म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2013 रोजी प्रकाशित
जिल्ह्यतील जल प्रकल्पांसाठी निधीची गरज
जिल्ह्यातील सध्या काम सुरू असलेल्या आणि प्रस्तावित जलसंपदा प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आ. जयंत जाधव यांनी जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्याकडे केली आहे. दमणगंगाव व नार-पार नद्यांचे पाणी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात आणण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प राबविण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

First published on: 10-07-2013 at 12:52 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District water projects needs fund