राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे उपराजधानीतील निवासस्थान असलेले ‘देवगिरी’ रंगरंगोटी आणि सजावटीनंतर स्वागतासाठी सुसज्ज  झाले असून आता हे निवासस्थान नव्या उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतीक्षेत आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानानंतर सर्वाधिक चर्चेत असणारे हे निवासस्थान आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार असल्याची घोषणा केली असली तरी विस्ताराबाबत अजूनही कुठलेही संकेत दिसून येत नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून देवगिरी बंगला उपमुख्यमंत्र्यांसाठी राखीव आहे. सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर ‘देवगिरी’मध्ये कोण राहणार? याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांची निवास व्यवस्था रविभवनमधून देवगिरीमध्ये केली जाण्याची शक्यता सार्वजानिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली असली तरी त्याबाबत अजूनही कुठलेही आदेश नसल्याचे सांगण्यात आले. अजित पवार यांचा मुक्काम आता आमदार निवासमध्ये राहणार आहे.
१० डिसेंबरपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत असल्यामुळे उपमुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेले देवगिरी सज्ज ठेवण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून पंधरा ते वीस कामगार परिश्रम घेत आहेत.  सी.पी. अ‍ॅण्ड बेरार काळात ‘देवगिरी’ हे आंतरराज्य नियंत्रण मंडळाचे कार्यालय होते. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर नागपूरला उपराजधानीचा दर्जा प्राप्त झाला. ठरल्यानुसार नागपुरात हिवाळी अधिवेशन घेतले जात असून या काळात उपमुख्यमंत्र्यांच्या निवासाची व्यवस्था या कार्यालयात करण्यात येऊ लागली. या निवासस्थानाला देवगिरी नाव देण्यात आले. कधीकाळी मोडकळीस आलेल्या या इमारतीत कालातंराने अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. देवगिरीमध्ये  सध्या फर्निचरची फिनिशींग सुरू आहे. यावर्षी काही नवे फर्निचर खरेदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत देवगिरी सुसज्ज झाले आहे. मुख्य प्रवेशद्वारातून महत्त्वाच्या व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी निवासस्थानाच्या बाजूला मंडप उभारण्यात येणार आहे. लॉनचे उत्तम पद्धतीने सुशोभिकरण करण्यात आले असून विविध प्रकारची फुलझाडे लावण्यात आली आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने निवासस्थानाच्या उत्तरेकडे लोखंडी पत्रे लावण्यात आली आहेत.
देवगिरीमध्ये तीन मोठे सभागृह असून तीन लहान खोल्या आहेत. या खोल्यांमध्ये उपमुख्यमंत्री खास व्यक्तींसोबतच चर्चा करतात. अन्य मोठय़ा सभागृहात शिष्टमंडळांना भेटण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे येणाऱ्या प्रत्येकाची चौकशी केली जाते. देवगिरीला लागूनच अन्य मंत्र्यांची निवासस्थाने असल्याने अधिवेशन काळात या परिसरात नागरिकांची, अधिकाऱ्यांची गर्दी असते.
त्यामुळे हा परिसर नेहमीच गजबजलेला दिसून येतो.  बंगल्यासमोर असलेले लॉन सुशोभित करण्यात आले असून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी राहणार आहे.