दुबई येथे झालेल्या सीकॉट या जागतिक अस्थिरोग परिषदेमध्ये सांगलीतील अस्थिरोग विशेष तज्ज्ञ डॉ. सुनिल पाटील यांनी दोन शोधनिबंध सादर केले. कोरोनाईड फॅक्चर्स व प्लोटिंग नी इन्शुरीज म्हणजेच हाताचे कोपर व गुडघ्याचे अपघाती फॅक्चर्स हे त्यांच्या शोधनिबंधाचे विषय होते. जगभरातील १५० राष्ट्रांतून ७ हजार अस्थिरोग तज्ज्ञ परिषदेसाठी जमले होते. त्यात डॉ.पाटील यांना भारतातर्फे निबंध सादर करण्याची संधी मिळाली. डॉ. पाटील हे गेली २४ वर्षे सांगली येथे अस्थिरोग शल्यचिकित्सक म्हणून तसेच भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज येथे सहप्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी अमेरिकन अॅकॅडमी, जर्मनी व ऑस्ट्रेलिया येथे शोधनिबंध सादर केले आहेत.