डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सम्यक क्रांतीचे समाजातील सूक्ष्म अवलोकन डॉ. योगेंद्र मेश्राम यांनी त्यांच्या साहित्यात  करताना कोणत्याही पुरस्कार व सत्काराची अपेक्षा बाळगली नाही, असे प्रतिपादन डॉ. मेश्राम यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत वक्तयांनी केले. विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सभागृहात झालेल्या सभेला मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. वाङ्मयावर निष्ठा ठेवणारे, विशिष्ट ध्येय ठेवून खपणारे असे मेश्रामांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी संपादक, कवी, कथाकार, कादंबरीकाराची भूमिका साकारत आंबेडकरी आंदोलनाची ज्योत सदैव साहित्यात तेवत ठेवली. विदर्भात डॉ. मेश्राम यांचे ‘लोकानुकंपा’ आणि मराठवाडय़ात गंगाधर पानतावणे यांचे ‘अस्मितादर्श’ने केवळ दलित अस्मितेलाच नव्हे तर संपूर्ण साहित्याला वैचारिक ऊर्जा पुरवली. हे दोन्ही ज्येष्ठ साहित्यिक विदर्भ भूमीतीलच असल्याचे गौरवोद्गार वक्तयांनी काढले.
डॉ. योगेंद्र मेश्राम यांचे मोठेपण सांगताना वक्तयांनी दिवंगत कवी ग्रेस यांचा उल्लेख केला. वैयक्तिक जगायचे असेल तर आंबेडकरी चौकट तोडून बाहेर पडावे लागेल. अशा व्यक्तींसाठी दलित गहिवरत नाहीत.
ग्रेसांनी आंबेडकरी मार्गातल्या प्रतिमा स्वीकारल्या नाहीत किंवा तसा आवही आणला नाही, हे विशेष. मात्र काही लोक स्वत:ला आंबेडकरी म्हणवतात आणि भलत्याच दिशेने जातात, यावर वक्तयांनी आक्षेप घेतला.
त्यांची गौरव करणारी यंत्रणा नव्हती. याचा रागही भाषणात व्यक्त करण्यात आला. साठी किंवा सत्तरीनिमित्त सत्कार करणारे त्यांचे शिष्य नव्हते, ना साहित्यिकांच्या ते कळपात होते, ना कुणा नेत्याचे लांगूनचालन त्यांनी केले. हारतुऱ्यांच्या अपेक्षेने त्यांनी कधी लिहिले नाही. डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा एक पाईक म्हणून सतत ते लेखणी झिजवत राहिले, या शब्दात वक्तयांनी त्यांचे मोठेपण विशद केले.
अखिल भारतीय भिक्खु महासंघाचे संघानुशासक भदंत सदानंद महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत कथाकार डॉ. प्रकाश खरात, कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, मारोतराव कांबळे, लेखक भास्कर सोनटक्के, श्रीपाद सबनीस, प्रा. डॉ. इंद्रजित ओरके, कवी इ.मो. नारनवरे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. ताराचंद्र खांडेकर, ज्येष्ठ पत्रकार रणजित मेश्राम, नाटककार दादाकांत धनविजय, ज्येष्ठ विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे आदींची यावेळी भाषणे झाली.
दिवंगत डॉ. मेश्राम यांच्या पत्नी शारदा मेश्राम कार्यक्रमाला उपस्थित होत्या.