नामांकित शिक्षण संस्थांकडून समाजाच्या वाढत्या अपेक्षा आहेत, त्यामुळे भविष्याचा वेध घेत शैक्षणिक संस्थांना बदलण्याची आवश्यकता आहे, असे मत प्रसिद्ध जलतज्ज्ञ माधव चितळे यांनी व्यक्त केले.
पंचवटीतील कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेतील कार्यक्रमात चितळे बोलत होते. काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेसारख्या तंत्र व कृषी शिक्षण प्रदान करणाऱ्या संस्थांनी आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. यापुढे प्रगत शिक्षण संस्थेचा निकष कोणती संस्था जास्तीत जास्त स्वत:चे उद्योजक निर्माण करू शकते असा राहणार आहे.
यासाठी प्रादेशिक स्तरावर आपली बलस्थाने ओळखून निसर्गाच्या अनुकूलतेनुसार उपलब्ध खनिजे, घेण्यात येणारी पिके, सौर ऊर्जा आणि पवन शक्ती या संदर्भात तंत्रशिक्षण पुरविणाऱ्या संस्थांनी उल्लेखनीय कार्य करणे गरजेचे आहे. कुशल कारागिरांची देशाला अत्यंत आवश्यकता असून ती जबाबदारी आधुनिक युगात तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांवर येऊन पडली आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून समाज व राष्ट्राच्या गरजा आपण भागवू शकलो तरच भविष्यात शिक्षण संस्थांना अस्तित्व व लौकिक प्राप्त होईल. त्यासाठी  आवश्यक ते बदल करण्याची   गरज निर्माण झाली आहे. हे आव्हान प्राध्यापकांनी स्वीकारावे अशी अपेक्षा चितळे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ, सचिव प्रा. के. एस. बंदी, अजिंक्य वाघ आदी उपस्थित होते. आभार प्रा. पी. टी. कडवे यांनी मानले.