‘त्यांनी’ निवडणूक शपथपत्रात आपली ५० कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यांची पाश्र्वभूमीही गडगंज श्रीमंतीची आहे, मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्यांना झोपडपट्टय़ांतील गटारे पायाखाली तुडवावी लागत आहेत, तेही चेहऱ्यावर अजिबात त्रासिक भाव न दिसू देता आणि ‘मी तुमच्यातलीच आहे’, असे दाखवत. पाच वर्षांपूर्वी दक्षिण मुंबई मतदारसंघातून अपक्ष म्हणून लढलेल्या मीरा संन्याल यांना आता आम आदमी पक्षाच्या तिकिटावर लढताना ते बरेचसे जमायला लागले आहे. एरवी सारा व्यवहार इंग्रजीत करणाऱ्या मीरा संन्याल आणि त्यांचे सहकारी मुंबईच्या या अस्सल ‘गिरणगावा’त मात्र आपणही ‘सामान्य’च असल्याचे प्रयत्नपूर्वक दाखवत असतात.
मीरा संन्याल यांची प्रचारफेरी काळाचौकी पोलीस ठाण्यापासून सुरू होणार असते. उन्हं उतरण्याची वाट पाहून, ठरलेल्या वेळेपेक्षा तासभर उशिराने ती सुरू होते. सुखवस्तू जीवनाची सवय असलेल्या मीरा शिवडी स्टेशन ओलांडून कार्यकर्त्यांसह काळाचौकी झोपडपट्टीतील अरुंद आणि निसरडय़ा गल्ल्यांमध्ये शिरतात. रस्त्यात सर्वत्र पसरलेले नळांचे पाइप्स, त्यांना समांतर वाहणारी गटारे आणि त्यातून फिरणारे उंदीर पाहून मीरा नाक मुरडतात आणि ‘‘बघा, खासदाराचे किती हे दुर्लक्ष!’’ म्हणून लोकांना सांगतात.
ही सारी कामे येथील खासदार मिलिंद देवरा यांच्या निधीतून झालेली असल्याचे दर्शवणाऱ्या कोनशिला ठिकठिकाणी लागल्या आहेत. ‘सी, हाऊ ही हॅज पुट दिज बोर्ड्स विदाऊट डुइंग एनी वर्क’, अशी चर्चा त्यांचे कार्यकर्ते आपसात इंग्रजीत करतात आणि मीरा या कोनशिलांचे फोटो काढून घ्यायला सांगतात. काही कार्यकर्ते या कोनशिलांवर देवरा यांचे नाव झाकले जाईल अशा रीतीने संन्याल यांचे स्टिकर्स लावतात. मोठय़ा मुश्किलीने तोल सांभाळत फिरत असताना मीरा या वस्तीतील उघडय़ानागडय़ा लहान मुलांचे कौतुक करतात आणि त्यांचे फोटो काढून घेतात. सगळ्यांना, त्यातही लहान मुलांना स्वत:च्या हाताने ‘आप’ची टोपी घालणे हा त्यांचा एक अनिवार्य कार्यक्रम बनतो. दुसरीकडे त्यांचे अनेक निष्ठावान कार्यकर्ते इमानेइतबारे वस्तीतील घराघरांत जाऊन प्रचारपत्रके देत असतात.
प्रचारफेरी अभ्युदय नगरातील प्रथमेश सहकारी गृहनिर्माण संस्थेसमोर पोहोचते, तेव्हा कार्यकर्ते गाणे गाऊन वातावरणनिर्मिती करतात. नंतर मीरा संन्याल हातात माइक घेऊन हिंदीत भाषण करतात. काँग्रेस आणि मनसेच्या प्रतिस्पर्धी उमेदवारांबाबत त्या थोडक्यात माहिती देतात आणि ‘त्यांनी तुमच्यासाठी काही चांगले काम केलेय असे वाटत असेल तर बेलाशक त्यांना मत द्या; पण परिस्थितीत बदल हवा असेल, तर मला एक संधी द्या,’ असे आवाहन त्या मतदारांना करतात. ‘मी तुम्हाला निराश करणार नाही,’ अशी हमीही त्या देतात. नंतर त्यांना एकदम काही तरी आठवते आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा परिचय त्या मतदारांना करून देतात.
इथून प्रचारफेरी झकेरिया बंदर वस्तीकडे सरकते. एका मोक्याच्या चौकात कुणी तरी आणून दिलेल्या स्टुलावर उभ्या राहून मीरा भाषण करतात. त्यांचे भाषण सगळीकडे अगदी सारखेच असते. ‘येथील काँग्रेस उमेदवार १० वर्षांपासून निवडून येत आहेत, तर मनसेचे उमेदवार २५ वर्षांपासून सक्रिय आहेत. त्यांच्या कामाशी तुम्ही परिचित आहात. भ्रष्टाचार हटवण्यासाठी देश झाडून स्वच्छ करण्याची वेळ आली आहे,’ असा भाषणाचा सूर असतो. ‘हमारे पास ट्रक या रेल्वे इंजिन नहीं है, भ्रष्टाचार हटानेवाला झाडू है,’ असे त्या म्हणतात तेव्हा मनसेच्या निवडणूक चिन्हाचा त्यांनी खुबीने उल्लेख केल्यामुळे कार्यकर्ते टाळ्या वाजवून दाद देतात. प्रत्येक ठिकाणी उपस्थितांना त्रिवार ‘जय हिंद’ म्हणायला लावून मीरा भाषणाचा शेवट करतात.
मार्गातील प्रत्येक लहान-मोठय़ा मंदिरासमोर आवर्जून क्षणभर थांबून, पण पायातील सँडल न काढता मीरा देवाला नमस्कार करतात. पुढे ख्म्वाजा गरीब नवाझ चौकात आल्यानंतर कुणी तरी सांगते- ‘यह झुबैदभाई का इलाका है.’ त्याबरोबर मीरा झुबैदभाईंच्या गळ्यात हार घालतात आणि त्यांना सोबत घेतात. आपल्या वस्तीतील या जाहीर कौतुकाने धन्य झालेले झुबैदभाई नंतर पूर्णवेळ प्रचारफेरीत फिरतात. झोपडपट्टीत फिरताना जवळच्या आस्मी मशिदीतून सायंकाळची अजान ऐकू येते, त्याबरोबर वस्तीतील लोक जरासे ‘अॅलर्ट’ होतात.
पुढे हा ताफा शिवडीच्या टी.जे. रोडवरील खिमजी विश्राम बिल्डिंगमध्ये पोहोचतो. फिक्या गुलाबी रंगाची साडी नेसलेल्या मीरा या चारमजली चाळीत झपाझप वर चढून जाऊन मतदारांना भेटतात. प्रचारफेरीच्या संपूर्ण कालावधीत चेहऱ्यावरील घाम त्या एकदाही पुसत नाहीत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील कमावलेले हसूही मावळत नाही. यानंतर कुठे जावे याबाबत वेगवेगळे कार्यकर्ते निरनिराळ्या सूचना करतात, पण बाई त्या सावधपणे ऐकतात आणि स्वत:ला पटलेला निर्णय घेतात. गणेशबागेतील भिकुमाळी चाळीत अंधाऱ्या गल्ल्यांमध्ये फिरताना त्या चाचपडतात, मात्र पुन्हा सावरतात.
आजच्या प्रचारफेरीचा समारोप शिवडीच्या मुस्लीम वस्तीतील जाहीर सभेने होतो. या वस्तीतील इम्रान पठाण नावाच्या युवकाचा आठ दिवसांपूर्वी खून झाल्याच्या घटनेच्या सावटाखाली ही सभा होते. मलिक नावाचे ‘आप’चे स्थानिक कार्यकर्ते ‘आपल्या लोकांसाठी’ प्रास्ताविक भाषण करून मीराताईंचे काम हलके करतात. सभेनंतर इम्रानच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी जायला त्या विसरत नाहीत. या वस्तीत मिळालेल्या लोकांच्या प्रतिसादाने सुखावल्यामुळे आजचा दिवस सार्थकी लागल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येतात..
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2014 रोजी प्रकाशित
‘इंग्रजाळलेलं’ सामान्यपण!
‘त्यांनी’ निवडणूक शपथपत्रात आपली ५० कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले आहे. त्यांची पाश्र्वभूमीही गडगंज श्रीमंतीची आहे, मात्र आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्यांना झोपडपट्टय़ांतील गटारे पायाखाली तुडवावी लागत आहेत, तेही चेहऱ्यावर अजिबात त्रासिक भाव न दिसू देता आणि ‘मी तुमच्यातलीच आहे’, असे दाखवत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 22-04-2014 at 01:05 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election campaign of meera sanyal