पालकांनी टाकून दिलेल्या किंवा गुन्हेगारीच्या विळख्यात अडकलेल्या मुलांना सामावून घेणाऱ्या बालसुधारगृहांतील वास्तव आता एका हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर उघड होणार आहे. महाराष्ट्रातल्या विविध बालसुधारगृहांमध्ये वाढलेल्या एका मुलाचाच या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये मोठा सहभाग आहे. आशीष देव दिग्दर्शित ‘ब्लॅक होम’ हा चित्रपट ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाद्वारे आतापर्यंत पूर्णपणे अपरिचित असलेला समाजातील एक कप्पा आपण समाजासमोरच उघडा करणार आहोत, असे देव यांनी सांगितले.
याआधी गेल्या वर्षी आलेल्या ‘आयना का बायना’ या चित्रपटातून बालसुधारगृहाची थोडीशी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. मात्र त्यात वास्तवाचे चित्रण खूपच त्रोटक पद्धतीने करण्यात आले होते. ‘ब्लॅक होम’ चित्रपटांच्या निर्मात्यांपैकी अजय सूर्यवंशी हा स्वत: वयाच्या तिसऱ्या महिन्यापासून १८व्या वर्षांपर्यंत या बालसुधारगृहातच वाढला आहे. ‘सामाजिक समता मंच’ सादर करत असलेल्या या चित्रपटात बालसुधारगृहातील मुलींचे जगणे दाखवण्यात येणार आहे.
बालसुधारगृहांची परिस्थिती खूपच भीषण आहे. सरकारने आखून दिलेला बालसुधारगृहांचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असला, तरी तो फक्त कागदावर साजरा होतो. प्रत्यक्षात आमच्या वाटय़ाला नरकयातना आहेत. मला आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी चित्रपट या माध्यमाची मदत घेतली. त्यासाठी मला सामाजिक समता मंचाचे विजय कांबळे, महेश साळुंके यांचे खूप मोठे सहाय्य लाभले, असे अजय सूर्यवंशी याने ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
या चित्रपटात मुरली शर्मा, मोहन जोशी, चित्राक्षी रावत, शरद पोंक्षे स्वत: अजय सूर्यवंशी असे कलाकार काम करणार आहेत. या चित्रपटाद्वारे अक्षय हरिहरन संगीत दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदाच हिंदी चित्रपटाला संगीत देत आहे.