विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १० डिसेंबरपासून सुरू होत आहे. अधिवेशनासाठी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था सिव्हील लाईन भागातील १६० गाळ्यांमध्ये करण्यात येणार असल्यामुळे अकरा महिने या गाळ्यामध्ये संसार करणारे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना किमान एक महिनाभर नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा लागणार आहे.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनानिमित्त मंत्र्यांच्या निवासस्थानासह आमदार निवास, नागभवन, १६० गाळ्यांच्या सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. या निमित्ताने मंत्रालयातील प्रत्येक विभागातील तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी नागपुरात येत असून त्यांची निवासाची व्यवस्था १६० गाळ्यांमध्ये करण्यात येते. जवळपास दरवर्षी २५० ते ३०० कर्मचाऱ्यांसह मंत्र्यांच्या बंगल्यावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था गाळ्यामध्ये केली जाते. गेल्या एक महिन्यापासून १६० गाळ्यांचे रंगरंगोटीचे काम सुरू आहे. अकरा महिने या गाळ्यांमध्ये वास्तव्य करणारे अनेक स्थानिक कर्मचाऱ्यांना दोन महिने आधी गाळे खाली करण्यास सांगितले होते. त्यापैकी अनेकांना किमान दीड ते दोन महिने बाहेर काढायचे असल्यामुळे त्यांनी नातेवाईकांचा आसरा घेतला. काही कर्मचारी खोलीच्या शोधात फिरताना दिसत आहेत. यावर्षी गाळ्यांमध्ये राहणाऱ्या काही लोकांना रविनगरच्या वसाहतीमध्ये जागा देण्यात आली असली तरी सगळ्यांना त्या ठिकाणी राहण्याची सोय नसल्यामुळे काहींनी नातेवाईकांकडे जाणे पसंत केल. १६० गाळ्यांचे रंगरंगोटी काम पूर्ण झाले असून उद्या, शनिवारपासून पाहुण्यांचे आगमन सुरू होणार आहे. गाळ्यांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या सर्व सोयी देण्याच्या उद्देशाने सार्वजानिक बांधकाम विभागाचे कर्मचारी काम करत आहेत.