वेकोलिचा सुरक्षा पंधरवडा सुरू असतांनाच मिथेन गॅसच्या गळतीने चंद्रपुरातील बल्लारपूर भूमिगत कोळसा खाणीत स्फोट होऊन आग लागली. यात कोटय़वधीचा कोळसा जळून राख झाला. ही आग अजूनही सुरू असल्याने खाण बेमुदत कालावधीसाठी बंद करण्यात आली असून आग विझवण्यासाठी ताडाळी व नागपूर येथील रेस्कू पथक दाखल झाले आहे. दरम्यान, सेंसर सिस्टीम लागली असतानाही आग लागल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात कसे आले नाही, यावरून वेकोलिच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा आहेत.
वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या बल्लारपूर भूमिगत कोळसा खाणीत तीन दिवसांपासून मिथेन गॅसची गळती सुरू होती, मात्र ही बाब वेकोलिचे अधिकारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्याही लक्षात आली नाही. गॅसची गळती सुरू असतांनाच काल बुधवारी मध्यरात्री खाणीत अचानक स्फोट होऊन आग लागली. यावेळी खाणीत दोनशे कामगार काम करत होते. आग लागताच सर्व कामगारांना सुरक्षितपणे खाणीबाहेर काढण्यात आले. यानंतर आग विझवण्यासाठी वेकोलिचे शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. काही केल्या आग विझत नाही, हे लक्षात येताच आज सकाळी वेकोलिच्या ताडाळी व नागपूर येथील रेस्कू पथकाला पाचारण करण्यात आले. आज सकाळपासून आग विझवण्यास सुरुवात झाली असली तरी दुपापर्यंत ती सुरूच होती. मिथेन गॅसची गळती सातत्याने सुरू असल्यानेच आग विझत नसल्याची माहिती वेकोलितील सूत्रांनी दिली.
दरम्यान, या आगीत कोटय़वधीचा कोळसा जळून राख झाला आहे. वेकोलिचा सुरक्षा पंधरवडा सुरू असताना ही दुर्घटना घडली. ही आग लागली तेव्हा बल्लारपूर व सास्ती कोळसा खाणीत सुरक्षा पंधरवडय़ाचा कार्यक्रमही सुरू होता. त्याच दरम्यान ही आग लागल्याने वेकोलिच्या सुरक्षा यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, वेकोलिच्या या खाणीत सेंसर सिस्टीम लावण्यात आलेली आहे. यात खाणीत कोणताही अपघात झाला किंवा आग लागली, बिघाड झाला तरी सायरन वाजतो, मात्र वेकोलिच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही आग लक्षात आलीच नाही. रात्रीपासून पहाटेपर्यंत ही आग सुरूच होती. आगीची माहिती मिळताच खाण व्यवस्थापक दयाकर, सब एरिया मॅनेजर जोसेफ घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी रेस्कू पथकाच्या माध्यमातून आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दरम्यान, आगीमुळे ही खाण बेमुदत कालावधीसाठी बंद करण्यात आलेली आहे. या खाणीत तीन पाळय़ांमध्ये एक हजार कामगार काम करतात. आगीमुळे खाण बंद झाल्याने सर्व कामगार आज खाणीसमोर उभे होते. आताही आग धुमसत आहे.