महापालिकेतील अनेक कंत्राटदार संगनमत करून एक सारखी निविदा भरून काम आपसात वाटून घेत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यामुळे महापालिकेने अशा कंत्राटदारांवर लक्ष केंद्रित केले असून महापालिका प्रशासनाने या प्रकरणी चार कंत्राटदारांची अनामत रक्कम जप्त करून त्यांना वर्षभरासाठी निलंबित केले आहे. राजकुमार बजाज, बाबा कंस्ट्रक्शन गुरूकृपा पॅलेस भंडारा रोड, दीपक ठाकरे, दीप कंस्ट्रक्शन गुलमोहर अपार्टमेंट मानकापूर, के .ए. लुल्ला शांती एंटरप्राईझेस इंदोरा, नारायण वैरागडे सिरसपेठ असे निलंबित करण्यात आलेल्या कंत्राटदाराची नावे आहेत.  
माहितीनुसार प्रभाग क्रमांक ४ मध्ये रबर मोल्डेड आय ब्लॉक पेव्हमेंट’ च्या कामासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या. यात या चारही कंत्राटदारांनी ३० – ७७ टक्के कमी दराने एक सारखी निविदा भरली होती. प्रत्येकाने ३० हजार रुपये अनामत रक्कम महापालिकेकडे जमा केली होती.
एक सारखी रक्कम असल्याने प्रशासनाने चारही कंत्राटदारांना बंद लिफाफ्यात सुधआरित दर मागितला होता. त्याचप्रमाणे १५ टक्के पेक्षा कमी दराची निविदा असल्यास संबंधित कंत्राटदाराकडून साहित्याची विस्तृत माहिती प्रशासनाकडून मागविण्यात आली. मात्र कंत्राटदारांकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नगर अभियंता संजय गायकवाड यांनी कॅफो यांचे मत घेतले.
कॅफो मदन गाडगे यांनी कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करून फेरनिविदा काढण्याच्या सूचना दिल्या.
आयुक्त श्याम वर्धने यांच्या आदेशावरून या चारही कंत्राटदाराची अनामत रक्कम जप्त करण्यात आली असून त्यांना चार वर्षांसाठी निलंबित करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या कामा व्यतिरिक्त या कंत्राटदारांना कोणत्याही कामासाठी निविदा प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.