अत्यंत चुरशीने आणि अटीतटीने झालेल्या इचलकरंजी शहर एन.एस.यू.आय.च्या शहर अध्यक्ष निवडणुकीत गौरव राजेश बिडकर याने बाजी मारली.
विद्यार्थ्यांमध्ये काँग्रेस पक्ष रुजावा यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने एन.एस.यू.आय. ही विद्यार्थी संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या शहर अध्यक्षपदासाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली. गौरव बिडकर आणि कुशाल सिंगी या दोघांमध्ये शहर अध्यक्षपदासाठी चुरस लागली होती. एकूण २३९३ युवा मतदारांनी मतदान केले.
प्रारंभी ऑल इंडिया फेडरेशन ऑफ को-ऑप. स्पििनग मिल्स्चे उपाध्यक्ष राहुल आवाडे यांनी निवडणूक प्रक्रियेची माहिती दिली. या वेळी साताराहून आलेले दिग्विजय पाटील, राहुल चव्हाण, सुरज कारदगे, शुभम गरुड, अजय कांबळे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी मार्गदर्शन केले.  खासदार राहुल गांधी यांची अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. प्रकाश आवाडे यांच्या हस्ते साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.