साधारण पाच ते सहा वर्षांपूर्वी मला माझ्या आईने सुचवलं अगं तु नाटक-मालिकांमध्ये काम केलंस.. पण जाहिरात क्षेत्रात मात्र काहीच केलं नाहीस.. मला पटकन जाहिरातीतली मॉडेल आठवली.. गोरा वर्ण, दिसायला सुंदर, असं खुप काही.. पण या सर्वात मी कुठेच बसत नव्हते. पण तरी माझ्या मनात आलं चला करुन तरी पाहू.. पुन्हा असं वाटायला नको आपण हे केलं नाही म्हणुन.. म्हणुन मी ऑडिशनला जायला सुरुवात केली. ऑडिशनला गेल्यावरही मनात कुठेतरी किंतू-परंतू होतंच. परंतु माझ्यात असलेल्या गुणांमुळे मला पहिल्या जाहिरातीची संधीही लगेच मिळाली.
पहिली जाहिरात केल्याबरोबर माझ्यातला आत्मविश्वास खऱ्या अर्थाने वाढला. आत्तापर्यंत मी केवळ माझ्याकडे काय नाही या गोष्टीचा विचार करत होते. पण माझ्याकडे काय आहे या गोष्टींची मला अजिबात जाणीव नव्हती. ती जाणीव मला नंतर याच क्षेत्रात झाली. माझी निवड का होत गेली याची कारणं मला कळली. माझ्या चेहऱ्यात एक साधेपणा आहे आणि तोच या क्षेत्राला हवा होता. माझ्यात असलेली उत्सफूर्तता आणि समयसुचकता या गोष्टीही महत्त्वाच्या होत्या.
आपल्यातील चांगल्या गोष्टी आपल्याला नव्याने कळतात त्याचा आनंद काही वेगळाच असतो. तोच आनंद मला जाहिरात करतांना मिळत गेला. प्रत्येक जाहिरात ही तुमच्या अंगातील कलागुणांवर आधारीत असते. ३० सेंकदाच्या छोटय़ाशा काळामध्ये तुम्हाला एक मॉडेल म्हणून स्वतला सिद्ध करायचं असतं. त्याकरता उत्सफूर्तपणा खूप कामी येतो. अर्थात हे मी माझ्याबाबतीतच बोलतेय. प्रत्येकासाठी हीच गोष्ट लागू पडेल असं अजिबात नाही. पण एकमात्र नक्की इथे तुम्हाला प्रचंड संयम ठेवावा लागतो. या क्षेत्रात त्याशिवाय गत्यंतर नाही.
‘व्हिम लिक्विड’च्या जाहिरातीमुळे मला ओळख मिळाली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबर केलेली जाहिरातही माझ्या चांगलीच लक्षात आहे. पोलिओची ही जाहिरात मी त्यांच्यासोबत केली. प्रत्येक कलाकाराचं अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याचं स्वप्नं असतं,  माझं ते स्वप्नं या जाहिरातीच्या निमित्ताने पूर्ण झालं. अमिताभ कसे काम करतात हे पाहायला मिळालं. हुसैन बरोबर ‘व्हिम डिशवॉश’च्या जाहिरातीसाठी माझी निवड झाली. ती जाहिरातही  सर्वाना खूप आवडली. माझे हावभाव आणि माझ्या कामाचं खऱ्या अर्थाने कौतुक झालं. हाच आनंद खूप आहे. शिवाय उत्तम दिग्दर्शक आणि कॅमेरामन यांच्याबरोबर काम करायची संधी मिळाली.

जाहिरातीत दिसणारी मॉडेल म्हणजे उंचीपुरी, गोऱ्या रंगाची एकूणच काय तर सुंदर असा समज शर्वरीने मनाशी बाळगला होता. तरीही शर्वरीने जाहिरात क्षेत्रात काम करुन तर बघु, म्हणून सुरुवात केली. सुरुवातीला ऑडिशनला जाताना मनात न्युनगंड बाळगून गेलेली शर्वरी आज जाहिरात क्षेत्रातील एक नावाजलेली मॉडेल आहे. व्हिम डिशवॉशच्या जाहिरातीने शर्वरीला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली. शर्वरी पाटणकर हिची अ‍ॅडजर्नी तिच्याच शब्दात.  

शर्वरीचा सल्ला 

जाहिरातीमध्ये आता सामान्य चेहऱ्यांना खूप महत्त्व आलं आहे. त्यामुळे इथे येताना कुठलाही नकारार्थी विचार मनात घेऊन येण्यापेक्षा तुमच्यात काय चांगलं आहे हे ओळखा. आज जाहिरातींचे क्षेत्र बदललेलं आहे त्यामुळे इथे सर्वसामान्य चेहऱ्यांना मोठी संधी आहे. संयम बाळगुन या क्षेत्रात पुर्णवेळ काम करायला हवं. तरच इथे तुम्हाला कामं मिळतील. महत्त्वाचं म्हणजे हे क्षेत्र ऑडिशनवर अवलंबुन आहे. त्यामुळे ऑडिशन देण्यात चालढकल न करणं हे अधिक उत्तम.

शर्वरीने केलेल्या जाहिराती
पोलिओ अमिताभसोबत, व्हिम लिक्वीड, केलॉग्ज, डाबर चवनप्राश, इझी ऑफ बॅंग, बिर्ला सनलाइफ इन्शुरन्स, गोदरेज हेअर डाय.