आपल्या आजारी आईला भेटण्यासाठी बंगळुरू येथून नागपूरकडे निघालेल्या एका तरुणीला रेल्वे प्रवासात गुंगीचे औषध देऊन १५ हजारांसह तिची बॅग पळविणाऱ्या एका दाम्पत्याचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. गुलबर्गा-वाडी दरम्यान हा प्रकार घडला.
शबाना सरदार खान (वय २०) ही तरुणी मूळ नागपूरची असून ती सध्या बंगळुरू येथे खासगी नोकरी करते. नागपूर येथे आपली आई आजारी असल्याने तिला भेटण्यासाठी व तिला औषधोपचाराचा खर्च देण्यासाठी शबाना ही कोईमतूर-कुर्ला व्हाया बंगळुरू एक्स्प्रेसने निघाली होती. तिच्या शेजारी एक जोडपे होते. प्रवासात ओळख वाढवत या दाम्पत्याने शबाना हिला खाण्यासाठी दहिभात दिला. दहिभात खाल्ल्यानंतर शबाना हिची शुध्दी हरपली. सोलापूरच्या अलीकडे ती शुध्दीवर आली तेव्हा तिला धक्काच बसला. कारण तिच्या जवळील १५ हजारांची रोकड व बॅग गायब झाली होती. प्रवासात दहिभात दिलेले जोडपेही गाडीत नव्हते. सोलापूर रेल्वे स्थानकात तिने आपली व्यथा मांडली. तेव्हा रेल्वे कर्मचाऱ्यांना गहिवरून आले. सर्वानी मदतीचा आधार दिला व तिला खासगी बसने नागपूरला पाठविले.