मुंबईत अमली पदार्थाची तस्करी आणि सेवनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अमली पदार्थविरोधी शाखेची कारवाईसुद्धा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढली आहे. सगळ्यात गंभीर बाब म्हणजे परदेशी, विशेषत: नायजेरियन नागरिकांचा यातील सहभाग वाढत असल्याचे दिसत आहे.
मुंबई शहर अमली पदार्थाच्या व्यापाराचे मोठे केंद्र बनले असल्याचे यापूर्वीच सिद्ध झाले आहे. या व्यपारातील लोकाचे नेटवर्क पोलीस यंत्रणेपेक्षा मजबूत असल्याने त्यांची पाळेमुळे खणून काढण्यात पोलिसांना अपयश येत आहे. परंतु कारवाईच्या आकडेवारीनुसार २०१२ च्या तुलनेत २०१३ मध्ये मोठी कारवाई झाल्याचे समोर आले आहे. २०१२ मध्ये अमली पदार्थाच्या व्यवहारांचे एकूण ९१९ गुन्हे दाखल झाले. तर २,९८२ लोकांना अटक करण्यात आली होती. तर २०१३ मध्ये १,४०७ गुन्हे दाखल करून तब्बल ४,११६ लोकांना अटक करण्यात आली आहे. २०१३ मध्ये एकूण साडेतीन कोटींहून अधिक रकमेचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आल्याची माहिती पोलीस उपायुक्त किशोर जाधव यांनी दिली.
अमली पदार्थाच्या व्यवहारात नायजेरियन नागरिकांचा समावेश सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे. गेल्या ६ वर्षांत अमली पदार्थ विरोधी शाखेने अमली पदार्थाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात एकूण २०४ परदेशी आरोपींना अटक केली. त्यापैकी १६८ आरोपी नायजेरियाचे नागरिक आहेत. त्या शिवाय टांझानिया, नेपाळ, कॅमेरून, इस्रायल, घाना, केनिया, आयव्हरी कोस्ट, युगांडा आदी देशांच्या नागरिकांनाही अटक केली आहे. परंतु तुलनेने त्यांची सख्या तुरळक आहे.
नायजेरियन लोकांची अमली पदार्थाच्या व्यवहारातील वाढती संख्या पाहता मुंबई पोलिसांनी त्यांच्यावर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे परिपत्रकच काढले होते. मात्र त्याची विशेष अंमलबजावणी झालेली नाही. अमली पदार्थ विरोधी कारवाई वाढली असली तरी हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे.
अमली पदार्थाचे व्यवहार अगदी झोपडपट्टय़ांपासून पंचतारांकित उच्चभ्रू वस्त्यांमध्येसुद्धा होतात. तरूण वर्गाला लक्ष्य बनवून त्यात ओढले जात आहे. त्यामुळे अमली पदार्थ रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
२०१३ वर्षांतल्या काही महत्वाचे गुन्हे
अमली      एकूण     अटक    जप्त मुद्देमाल           किंमत
पदार्थ     प्रकरणे              (किलोमध्ये)        
 हेरॉईन     ८    १२    ३ किलो २३५ ग्रॅम               ४३ लाख ५ हजार
चरस     ४०    ५३           १२८ किलो २०० ग्रॅम      १ कोटी ५५ लाख २१ हजार
कोकीन    ३८    ४६    १ किलो १८६ ग्रॅम                   ७ लाख ७७ हजार
गांजा    २१    २३    २७७ किलो ४०० ग्रॅम                 २९ लाख ८५ हजार
केटामाईन    १    ३    १३ किलो                 ४५ लाख ५० हजार
ओपियम    १    १    २ किलो                  १ लाख ६० हजार