अलिकडेच पाऊस आणि गारपिटीचा त्रास सहन केलेल्या तालुकावासियांच्या अंगातून आता उष्म्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत. असे असले तरी दुपारी चारनंतर तापमान कमी होत असल्याने रात्री काहीसा थंडावा मिळत आहे.
आठवडाभर कळवणचे तापमान ३५ ते ३७ अंश यादरम्यान राहिले आहे. उन्हामुळे अकरा वाजेनंतर रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. उष्म्यापासून थंडावा मिळावा म्हणून शीतपेय, आइस्क्रिम विक्रेत्यांकडे गर्दी वाढत आहे. टरबूज विक्रीसही त्यामुळे मागणी वाढली आहे. मार्चमध्ये इतका उष्मा गेल्या कित्येक वर्षांत जाणवलेला नव्हता. मागील महिन्यात झालेला पाऊस आणि गारपिटीमुळे हवामानात झालेला बदल या उष्म्यासाठी कारणीभूत असल्याचे मानले जात आहे.
उष्मा असाच वाढत राहिल्यास मे महिन्यात तापमान ४४ अंशापुढे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंधरवाडय़ात तालुक्यात तापमानामध्ये झालेले बदल चक्रावून टाकणारे आहेत.
२७ मार्च या एकाच दिवसाचे उदाहरण घेतले तरी हा बदल लक्षात येईल. या दिवशी सकाळी सात वाजता तापमान ५.४ अंश, नऊ वाजता १५, दहा वाजता २४.१, अकरा वाजता ३२. बारा वाजता ३५.४ आणि दुपारी दोन वाजता ३६.८ अंश याप्रमाणे नोंद झाली आहे.
दुपारी चारनंतर तापमान पुन्हा कमी होत जाते. एकंदरीत रात्री थंडी, दिवसा ऊन अशा संमिश्र तापमानाचा अनुभव कळवणकर घेत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st Apr 2014 रोजी प्रकाशित
कळवणमध्ये कहर.. दिवसा उष्मा अन् रात्री थंडी
अलिकडेच पाऊस आणि गारपिटीचा त्रास सहन केलेल्या तालुकावासियांच्या अंगातून आता उष्म्यामुळे घामाच्या धारा निघत आहेत.
First published on: 01-04-2014 at 07:27 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heat during the day and cold in night