काळजाचा थरकाप उडविणारा आवाज, भोवळ येईल असा तीव्र दर्प आणि एकाच वेळी हजारोंच्या संख्येने झेपावणारा थवा.. वटवाघळांच्या विश्वाची अशी थरारक सफर करायची असेल, तर एखादा हॉलिवूडपट पाहायला हवा. पण त्याचीही आता गरज नाही. याचे कारण उस्मानाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी हॉलिवूडपटापेक्षा अधिक आश्चर्यकारक वटवाघळे सहज पाहावयास मिळतात.
एरवी वटवाघूळ म्हणजे किळसवाणा प्राणी. ते स्वतची विष्ठा खातात. अंगाला चिकटतात, कान कुरतडतात. एवढेच नव्हे, तर पती-पत्नीचे संभाषण चोरून ऐकणारा वटवाघळाच्या जन्माला जातो, असे किती तरी समज-गरसमज आजही प्रचलित आहेत. परंतु त्यामुळेच पर्यावरणाचा खरा मित्र असलेले वटवाघूळ मानवाच्या हेटाळणीचा विषय होऊन बसले. राज्यात वटवाघळांची संख्या नेमकी किती आहे, त्यांच्या एकूण किती प्रजाती आहेत, त्यांची वास्तव्याची ठिकाणे कोणती, त्यांची जीवनपद्धती काय आहे, यावर शास्त्रीय दृष्टिकोनातून फारसा अभ्यास झालाच नाही. जगभरातील अनेक देशांत वटवाघूळ अभ्यासाचा विषय आहे. आपल्याकडे त्याची उपेक्षाच होते.
मात्र, प्रचलित समज दूर करून पर्यावरणाच्या निसर्गचक्रात वटवाघळांची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण कशी आहे, हे शोधण्याचे काम बारामती येथील पर्यावरण अभ्यासक डॉ. महेश गायकवाड करीत आहेत. पुणे विद्यापीठातून पश्चिम घाटातील वटवाघळांची जैविकता या विषयावर पीएच. डी. प्राप्त हा अवलिया महाराष्ट्राच्या दऱ्या-खोऱ्यांमध्ये रात्रंदिवस वटवाघळांचा अभ्यास करीत हिंडत असतो. उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या वटवाघुळांचा अभ्यास करून नळदुर्ग येथील किल्ल्यात राज्यात सर्वाधिक संख्येने वटवाघूळ असल्याचा निष्कर्ष त्यांनी काढला आहे.
जगभरात वटवाघळांच्या सुमारे एक हजारांहून अधिक प्रजाती आहेत. सस्तन प्राणी असलेल्या वटवाघळांच्या महाराष्ट्रात जवळपास ३४ प्रजाती आढळतात. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक २८ प्रजातींची नोंद करण्यात आली. मात्र, त्यांची संख्या उस्मानाबादच्या तुलनेत खूप कमी आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ११ प्रजाती आढळतात. यातील काही प्रजातींची संख्या तर एकाच ठिकाणी ५० हजारांहून अधिक असल्याचे डॉ. गायकवाड यांच्या अभ्यासातून स्पष्ट झाले. जिल्ह्यात आढळणाऱ्या ११ प्रजातींपकी रायनोकोमा हार्डविकी हे शेपटी असणारे अत्यंत दुर्मिळ वटवाघूळ नळदुर्ग किल्ल्यातील उपल्या बुरूजावर आजही अस्तित्वात आहे. कीटकभक्षी असणारी ही प्रजाती मोठय़ा वेगाने लुप्त होत आहे. राज्यात नळदुर्गनंतर चंद्रपूर व अन्य एक-दोन ठिकाणीच ती उरली असल्याचे डॉ. गायकवाड यांनी सांगितले. जिल्ह्यात आढळणाऱ्या ११ पकी फ्लाइंग फॉक्सेस, सायनेटेरस स्फिन्स, राऊझेटस लेस्त्रॉल्टि या तीन प्रजाती फलाहारी ट्राडारिडा किल्क्टा, टॅप्यूजस लॉन्जिमॅनस, स्कोटोफिलस हिबी, पिपिस्ट फोलोनिक्स, पिपिस्टल कोलोमान्ड्रा, हिप्पोसायरस ज्यूरिस, हिबी या ७ कीटकभक्षी, तर मेगाडर्मालायरा नावाची बेडूक व उंदीर खाणारी प्रजातीही जिल्ह्यात आढळून येते.
पर्यावरण व शेतीच्या दृष्टीने वटवाघळांचा अभ्यास अत्यंत महत्त्वाचा असल्याची बाब डॉ. गायकवाड यांनी राज्य सरकारच्या पर्यावरण विभागाच्या लक्षात आणली. त्यानुसार २०१३-१४ या वर्षांसाठी सरकारने ग्रीन आयडियाज् योजनेंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील वटवाघळांच्या प्रजातींचा अभ्यास करण्यासाठी नावीन्यपूर्ण प्रकल्प आखला. त्याच्या पूर्ततेची जबाबदारी वटवाघळांचे संशोधक डॉ. गायकवाड यांच्यावर सोपविली. जिल्हाभरात त्यांनी केलेल्या अभ्यासातून अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील ११ प्रजातींपकी एकटय़ा नळदुर्ग किल्ल्यात ५ प्रजातींची वटवाघळे वास्तव्यास आहेत. यातील राऊझेटस लेस्त्रॉल्टि या प्रजातीची संख्या तर लाखाच्या पटीत आहे.
जिल्ह्यातील काटी, धामणगाव, सिंदफळ, आपसिंगा, उस्मानाबाद, किणी, कुंथलगिरी, परंडा येथील भुईकोट किल्ला, अचलबेट, अचलेर, नंदगाव, मुळज, वागदरी, तुळजापूर, येडशी, खानापूर, इंदापूर, कळंब अशा अनेक गावांमध्ये वटवाघळे आढळून येतात. झाडावर, जुन्या वाडय़ात, घरातील दरवाजा अथवा िभतीच्या फटीत, जुनी, मंदिरे, विहिर, गुहा आणि डोंगर कपाऱ्यात राहणाऱ्या वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी डॉ. गायकवाड गुहेत अक्षरश सरपटत जाऊन त्यांचा शोध घेत आहेत.
वटवाघूळ शेतकऱ्यांचा मित्र – गायकवाड
वटवाघळांना नाकाद्वारे गंध घेण्याची निसर्गतच अलौकिक शक्ती मिळाली आहे. कोणत्याही फळाला पाड लागल्याचा गंध सर्वप्रथम वटवाघळांना येतो. आंबा पाडाला आल्याची सूचना शेतकऱ्यांना वटवाघळामुळेच मिळते. पाखरखाती म्हणून जी फळे आपण मोठय़ा आनंदाने तोतरे बोलणाऱ्या लहान मुलांना देतो, मुळात ती वटवाघळांनी चाखलेली असतात. कीटकभक्षी वटवाघुळे एका रात्रीत सुमारे दीड हजारांच्या आसपास डासांचे भक्षण करतात. त्यामुळेच निसर्गातील कीटकांच्या वाढणाऱ्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते. कीटक, बेडूक व उंदीर अशा शेतीस उपद्रव करणाऱ्या घटकांनाही वटवाघळांमुळे र्निबध बसतो. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे मित्र आहेत. फलाहारी वटवाघळांमुळे झाडांच्या बियांचे विस्तारीकरण होऊन नसíगकरीत्या वृक्षारोपणाचे महत्त्वपूर्ण काम अनेक शतकांपासून अविरत सुरू आहे. अशा रितीने वटवाघळांचे आपल्या गावात वास्तव्य असल्यास त्याची माहिती कळवावी, असे आवाहनही डॉ. गायकवाड यांनी केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2013 रोजी प्रकाशित
नळदुर्गच्या किल्ल्यात वटवाघळांचा ‘घरोबा’!
काळजाचा थरकाप उडविणारा आवाज, भोवळ येईल असा तीव्र दर्प आणि एकाच वेळी हजारोंच्या संख्येने झेपावणारा थवा.. वटवाघळांच्या विश्वाची अशी थरारक सफर करायची असेल, तर एखादा हॉलिवूडपट पाहायला हवा.
First published on: 31-07-2013 at 01:58 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: House of bat in naladurg fort