जात, धर्म, भाषा व प्रांताच्या वृथा अहंकाराचा त्याग केल्याशिवाय देशात शांतता नांदणार नाही, असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे अभ्यासक डॉ. ऋषिकेश कांबळे यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या यूजीसी-अ‍ॅकॅडमिक स्टाफ कॉलेजमध्ये महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. कांबळे बोलत होते. संचालक डॉ. एम. डी. शिरसाट अध्यक्षस्थानी होते. डॉ. कांबळे म्हणाले, की योग्य जलवाटप झाले नाही तर देशात अराजक माजेल, असा इशारा बाबासाहेबांनी दिला होता. लोकसंख्येचा प्रस्फोट थांबविल्याशिवाय देशाचे कल्याण होऊ शकणार नाही. लोकसंख्येचा प्रस्फोट थांबविण्याची इच्छाशक्ती कोणत्याच राजकीय पक्षात नाही. तरुणांच्या हाताला काम मिळाले नाही, तर देशात नक्षलवाद व दहशतवाद वाढीस लागेल. डॉ. आंबेडकर अतिशय द्रष्टे नेते होते. त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत. डॉ. आंबेडकरांनी मांडलेले कुटुंबनियोजनाचे बिल, पाकिस्तानविषयक विचार, नद्याजोडणी प्रस्तावासाठीचा त्यांचा आग्रह, भाषावार प्रांतरचना आदी विषयांवरील विचारातून त्यांच्या दूरदृष्टीची प्रचिती येते. डॉ. कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक संजय शिंदे यांनी केले.