मजुरीवाढीच्या मागणीसाठी यंत्रमाग कामगार बेमुदत काम बंद आंदोलनात उतरल्याने सोमवारी इचलकरंजी शहर व परिसरातील यंत्रमागाचा खडखडात अनिश्चित काळासाठी थांबला आहे. आंदोलनात सुमारे ५० हजार कामगार उतरले आहेत. पहिल्याच दिवशी यंत्रमागधारक व कामगारांत वादावादी घडल्याने आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे. खासदार राजू शेट्टी यांनी कामगारांच्या मेळाव्यास उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. यंत्रमागधारक प्रतिनिधींबरोबर चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू. त्यासाठी शासन दरबारी हालचाली करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.    
यंत्रमाग कामगारांच्या त्रवार्षिक मजुरीचा करार संपला आहे. आठ तासाच्या पाळीला ४०० रुपये वा मासिक १० हजार रुपये वेतन मिळावे यासाठी यंत्रमाग कामगार संयुक्त कृती समितीने सोमवारपासून बेमुदत काम बंदची हाक दिली होती. त्याला आजच्या पहिल्याच दिवशी प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच शहरातील सर्व यंत्रमाग बंद होते. कामगारांनी बेमुदत बंदवर जाण्याचा निर्णय घेतल्याने अनेक भागात यंत्रमागधारक व त्यांच्यात शाब्दिक वादावादीचे प्रसंग घडले.
यंत्रमाग बंद ठेवून कामगार शाहू पुतळ्याजवळ जमले होते. तेथून मोर्चा काढण्यात आला. शहराच्या मुख्य मार्गावर फिरून त्यांनी शक्तिप्रदर्शन केले. मोर्चात सात ते आठ हजार कामगार सहभागी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. नाटय़गृह चौकात मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी कॉ. दत्ता माने, शामराव कुलकर्णी, मिश्रीलाल जाजू, भरमा कांबळे, राजेंद्र निकम, हणमंत लोहार, सचिन खोंद्रे यांची भाषणे झाली. खासदार शेट्टी यांनी मेळाव्यास उपस्थित राहून आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.     
दरम्यान उद्या मंगळवारी यंत्रमाग कामगारांच्या विविध मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघाच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन केले आहे. महात्मा गांधी पुतळ्याजवळ दुपारी चार वाजता सभा होणार असून त्यास कामगारांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कॉ. अतुल दिघे यांनी केले आहे. यावेळी आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे.