छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासनाने निश्चित केलेल्या तारखेलाच म्हणजे १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याचा निर्णय सोलापूरच्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने घेतला आहे. शहर व जिल्ह्य़ात एकाचवेळी शिवजयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष रणजित कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
यंदाच्या वर्षी १५ ते १९ फेब्रुवारी या काळात शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार असून १९ फेब्रुवारी रोजी भव्य मिरवणुकीने शिवजयंती उत्सवाची सांगता होणार आहे. व्याख्याने, विविध सांस्कृतिक व क्रीडा स्पर्धा, आरोग्य शिबिरे आदी उपक्रम राबविले जाणार आहेत. शहरात शिवजयंती उत्सव साजरी करण्याची परंपरा सुमारे पन्नास वर्षांपासूनची आहे. गेल्या ३५ वर्षांपासून या उत्सवाला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील शिंदे चौकातील डाळिंबी आड मैदानावर दरवर्षी अक्षय तृतीयेला शिवजयंती साजरी करण्याची प्रथा होती. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १९ फेब्रुवारी हाच शिवाजी महाराजांचा जन्मदिन असल्याचे जाहीर करून त्याप्रमाणे याच दिवशी शिवजयंती साजरी करण्याचा निर्णय घोषित केला होता. परंतु सोलापुरात १९ फेब्रुवारीऐवजी अक्षयतृतीयेलाच शिवजयंती साजरी केली जात होती. याशिवाय अन्य विविध शिवप्रेमी संघटना वेगवेगळ्या तारखांना शिवजयंती साजरी करीत असल्यामुळे शिवजयंतीचा उद्देश व हेतू सफल होत नव्हता. तसेच शिवजयंती साजरी करण्यासंदर्भात वादाचे प्रसंगही निर्माण होत होते. शिवाय देशातील सर्व युगपुरूष व राष्ट्रपुरूषांची जयंती व पुण्यतिथी इंग्रजी तारखांनुसार एकाचवेळी साजरी होत असल्यामुळे शिवजयंतीबद्दल तिथीचा घोळ न घालता ही चुकीची प्रथा मोडीत काढत असल्याचे रणजित कोल्हे यांनी स्पष्ट केले. या वेळी शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे दास शेळके यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jan 2013 रोजी प्रकाशित
सोलापुरात अक्षयतृतीयेऐवजी १९ फेब्रुवारीलाच शिवजयंती
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शासनाने निश्चित केलेल्या तारखेलाच म्हणजे १९ फेब्रुवारीलाच साजरी करण्याचा निर्णय सोलापूरच्या श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने घेतला आहे. शहर व जिल्ह्य़ात एकाचवेळी शिवजयंती साजरी केली जाणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष रणजित कोल्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.
First published on: 10-01-2013 at 08:09 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In solapur shiv jayanti will be celebrated on 19th february only