मोटारसायकलवर आलेल्या लुटारूंनी एका तरुणीचा मोबाईल हिसकावून पळून गेले. नरेंद्र नगरातील सुरेंद्रनगरात सिमेंट रोडवर रविवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास ही घटना घडली. केवळ रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्या लुटण्याचे प्रमाण वाढतच असून आरोपींच्या अटकेचे प्रमाण मात्र त्या तुलनेत कमीच आहे.
तनिशा गोदरे ही तरुणी रस्त्याच्या कडेला मोबाईलवर बोलत होती. तेवढय़ात मोटारसायकलवर दोन तरुण आले. त्यापैकी मागे बसलेला तनिशाजवळ पायी आला. तिच्या हातातील मोबाईल हिसकावून पळून गेला. याप्रकरणी प्रतापनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दुसरी घटना रविवारी दुपारी पावणेपाच वाजताच्या सुमारास क्वेटा कॉलनीत घडली. मोटारसायकलवर आलेल्या लुटारूंनी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून नेली. राजश्री रामराज नाडार या जाऊसह लकडगंज बाजारात भाजी घेण्यासाठी गेल्या होत्या. पायी घरी परत जात असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरील दोघांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन (किं. अडीच लाख रुपये) खेचून पळून गेले. याप्रकरणी लकडगंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तिसरी घटना व्हीआयपी मार्गावरील नव्या सेंट्रल मॉलसमोर शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. विभा आनंद लोणारे (रा. विश्रामनगर) या त्यांच्या पतीसह अ‍ॅक्टिव्हाने (एमएच/३१/सीएक्स/५६५४) दीक्षाभूमीहून घरी जात होत्या. मागून स्पोर्ट्स बाईकवर  आलेल्या लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र (किं. ६६ हजार रु.) खेचून नेले.
याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा नोंदवला. चवथी घटना सिव्हिल लाईन्समधील पोलीस जिमखानासमोर शनिवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास घडली. श्रीनिवास रामन्ना नाटकुरु (रा. दीपकनगर) हा त्याच्या सायकलने घरी जात होता.
स्कूटरने (१५६४) आलेल्या तिघांनी त्याला अडवून मोबाईलसह ४ हजार ९२० रुपयांचा ऐवज लुटून नेला. याप्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा नोंदवला.