जे का रंजले गांजले त्यासी त्रास देऊ पहिले, हा मंत्र जपणारे दुष्काळातही केवळ स्वार्थाचेच राजकारण करत असल्याची टिका ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी पालकमंत्री बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता केली.
श्रीगोंदे तालुक्याच्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी विखे आज आले होते. यावेळी रत्नापूर मंगल कार्यालयात आयोजित दुष्काळी मेळाव्यात ते बोलत होते. माजी आमदार शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब गिरमकर, तुकाराम दरेकर, राहुल जगताप, हेमंत ओगले यांच्यासह कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
विखे यांनी नाव न घेता पाचपुतेंवर टीका केली. आपण पालकमंत्री आहोत याचे भान असणे गरजेचे आहे.
ज्या पंढरपूरला आपण जातो, अभंग म्हणतो त्याचे आचरण करतो का, याचा विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले. कुकडीचे पाणी नगर जिल्ह्य़ाच्या हक्काचे आहे, मात्र पुणेकरांनी त्यावर दरोडा घातला आहे. नगरचे पाणी जायकवाडीला दिले जाते, मग कुकडीचे पाणी नगरला का नाही, याचे उत्तर द्यावे. मंत्रीपद वाचवण्यासाठी काहीजण पुणेकरांचे मांडलीक झाले आहेत, असा आरोपही विखे यांनी केला. मात्र, त्याचा जाब जनता त्यांना विचारील, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारच्या नरेगा योजनेच्या अनुषंगानेही विखे यांनी जोरदार टीका केली. याबाबत तालुक्या, तालुक्यात खूप मोठे प्रबोधन झाले, परंतु शासनाचे परिपत्रक आले, तेव्हा जनतेचा भ्रमनिरास झाला. कागदपत्रांच्या पूर्ततेसाठीच शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला, तोही वाया गेल्याची खंत यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केली. याबाबत बोलताना विखे म्हणाले, अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांच्या दहशतीला घाबरण्याचे कारण नाही. अधिकाऱ्यांनी दुष्काळात जीव ओतून काम करावे. यासाठी त्यांना अभय मिळण्याबद्दल मुख्यमंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घालू.
पेप्सीकोला, लिमका या कंपन्यांचे पाणी दुष्काळात कापले जात नाही, मात्र शेतीला देताना कपात केली जाते, अशा प्रकारे विखे यांनी चौफेर टिका करत श्रीगोंदे तालुक्यातील इतर सर्वानी एकत्र येण्याचे आवाहन केले. तसे न झाल्यास कुकडीचेच काय कोणतेच पाणी मिळणार नाही व तालुका उजाड होईल कारण यापुढे पाण्यासाठी मोठा संघर्ष होणार आहे, असे विखे यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवाजीराव नागवडे, कुंडलिक जगताप, तुकाराम दरेकर, बाळासाहेब गिरमकर यांची भाषणे झाली.
नाहाटा पुन्हा ‘इकडे’
काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीत गेलेले नाहाटा आज पुन्हा काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले. त्यामुळे उपस्थितांत नाहाटा नेमके कोणीकडे आहेत, अशी चर्चा सुरू होती.