रौप्य महोत्सवी वर्षांची सांगता करताना यंदाच्या रंगोत्सवात ‘इंद्रधनु’ संस्थेने ठाणेकरांसाठी काही नावीन्यपूर्ण कार्यक्रमांचा नजराणा आणला आहे. गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या ‘उद्याचा सामथ्र्यशाली भारत घडविण्यासाठी’ या विषयावरील  व्याख्यानाने गुरुवार ६ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृहात यंदाच्या रंगोत्सवाचे उद्घाटन होईल. याच वेळी संस्थेतर्फे दिल्या जाणाऱ्या युवोन्मेष पुरस्काराचे वितरण होणार असून कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.
यंदा प्रथमच रंगोत्सवात दोन वैशिष्टय़पूर्ण प्रदर्शने ‘इंद्रधनु’ने आयोजित केली आहेत. एम. एफ. हुसेन यांचे सहकारी कै. रामनाथ गोवेकर यांनी गीताबाली, नर्गीस, मीनाकुमारी, मधुबाला आदी तारकांसाठी केलेल्या १५० ज्वेलरी डिझाइन्सचे तसेच विख्यात छायाचित्रकार अविनाश गोवारीकर यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन ७ ते ९ डिसेंबर दरम्यान ठाणे कलाभवनात सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत नागरिकांना विनामूल्य पाहता येतील. अमिताभ ते सचिन, माधुरी ते कतरिना अशी अनेक तारकांची छायाचित्रे या प्रदर्शनात असणार आहेत.
मुख्य रंगोत्सव सोहळा ८ आणि ९ डिसेंबर दरम्यान श्री समर्थ सेवक मंडळाच्या पटांगणावर होणार आहे. शनिवारी संध्याकाळी पहिल्या सत्रात तौफिक कुरेशी शास्त्रीय आणि आधुनिक संगीताचे फ्यूजन सादर करणार आहेत. दुसऱ्या सत्रात महेश मांजरेकर आणि अविनाश गोवारीकर यांच्याशी सुधीर गाडगीळ हितगुज साधणार आहेत.
रविवारी ९ डिसेंबर रोजी भारतीय चित्रपटसृष्टीच्या शताब्दी वर्षांनिमित्त ‘राज ते रणधीर कपूर’  हा नृत्य, गाणी आण चित्रफितींचा विशेष कार्यक्रम सादर केला जाणार आहे. धवल चांदवडकर, सागर सावरकर, जयदीप बगवाडकर, शैलजा सुब्रमण्यम, नेहा वर्मा हे गायक कलावंत कार्यक्रमात सहभागी होत असून अप्पा वढावकर संगीत संयोजन करणार आहेत. संहिता लेखन सलील सावरकर आणि हर्षला बोरकर यांचे असून शर्मिष्ठा तसेच सहकाऱ्यांनी नृत्ये दिग्दर्शित केली आहेत. अंगद म्हैसकर आणि शर्मिष्ठा राऊत निवेदन करणार आहेत. पूर्णोत्सव देणगी प्रवेशिका न्यू सिंफोनी- गोखले रोड आणि चित्रवाणी-राम मारुती रोड येथे उपलब्ध आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indradhanush trust organise different programme