गोखले एज्युकेशन सोसायटीची डॉ. एम. एस. गोसावी उद्योजकता विकास संस्था आणि अमेरिकेतील ‘इंडिया ३-२-१’ यांच्या वतीने ‘उद्याचा विकसित भारत..’ या संकल्पनेवर २४ ते २६ जानेवारी या कालावधीत येथे ‘उवाच-२०१४’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. संस्थेच्या जे. डी. सी. बिटको इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅण्ड रिसर्च येथे होणाऱ्या या परिषदेच्या माध्यमातून नवीन कल्पना आणि विचार यांच्या देवाणघेवाणीसाठी विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
सर्वसामान्यांचे विचार, त्यांची स्वप्ने आणि ती पूर्ण करताना त्यांना येणाऱ्या अडचणी यांचा मागोवा या परिषदेत घेण्यात येईल. आजच्या तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसाशी त्यांचे नाते जोडण्यासाठी केला जाणारा हा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे. या परिषदेमध्ये तज्ज्ञांचे अभिभाषण, प्रशिक्षण कार्यक्रम, पथनाटय़, गटचर्चा आदी विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत.
२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त व्यवस्थापन शास्त्राचे ७५ विद्यार्थी नाशिकमध्ये चार विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधून मूलभूत सुखसुविधा, आर्थिक विकास, शिक्षण, स्वच्छता याविषयी त्यांचे मत जाणून घेणार आहेत. सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य अधिक चांगले कसे करता येईल, समाज, सरकार आणि उद्योजकता या तीनही घटकांमध्ये अधिकाधिक पारदर्शकता कशी निर्माण होईल, शिक्षण, उद्योजकता विकास व येणाऱ्या कुंभमेळ्यात प्रशासन आणि सुव्यवस्था कशी राखता येईल या आणि अशा विविधांगी विषयांवर चर्चासत्रे होणार आहेत.
भारतीय प्रशासन सेवेतील निवृत्त अधिकारी व चाणक्य मंडळाचे संचालक अविनाश धर्माधिकारी, अमेरिकेतील इंडिया ३-२-१ संस्थेचे सदस्य मनोज पंडय़ा आणि मुंबई येथील निर्माण   ग्रुप   ऑफ   इंडस्ट्रीजचे    संचालक  अजित   मराठे   यांचे   मार्गदर्शन  विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
आजची तरुण पिढी हीच स्वप्नातला भारत प्रत्यक्षात आणू शकते. योग्य ते मार्गदर्शन व प्रेरणा मिळाल्यास विकसनशील भारताचे रूपांतर विकसित भारतामध्ये होण्यास वेळ लागणार नाही. पर्यावरणाचे रक्षण आणि उद्योजकतेचा सर्वागीण विकास हेच यशाचे खरे सूत्र आहे. याची जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे.
ही आंतरराष्ट्रीय परिषद तरुण उद्योजक आणि विद्यार्थ्यांना यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शक ठरेल. अमेरिकेतील ‘चिप इन’ या सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य यासाठी मोलाचे काम करणाऱ्या संस्थेने या परिषदेसाठी सहकार्य केले आहे,   अशी   माहिती    उद्योजकता विकास   संस्थेचे   संचालक डॉ. विजय गोसावी यांनी दिली.