आपत्ती ही संधी मानून भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष शांतिलाल मुथा यांनी तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गाळ काढण्याचे भरीव कार्य केले. या कामाची मुख्य सचिव जयंत बांठिया यानी पाहणी करून समाधान व्यक्त केले. महिनाभरात जवळपास १०० तलावांतून २० लाख क्युबिक मीटरपेक्षा जास्त गाळ काढण्यात आला. भविष्यात आणखी चांगले काम करता येईल, या विषयी नियोजन करण्यासाठी मुथा यांना बांठिया यांनी चर्चेसाठी निमंत्रण दिले.
जिल्ह्य़ाच्या पाच तालुक्यांत ११९ तलावांमधील गाळ उपसण्याचे काम भारतीय जैन संघटनेने हाती घेतले. महिनाभरात सुमारे ८५ तलावांतील गाळ उपसण्यात आला. उर्वरित तलावांतील गाळ मोठय़ा प्रमाणात काढला. आतापर्यंत २० लाख क्युबिक मीटरपेक्षा जास्त गाळ काढण्यात आला. बांठिया यांच्यासह विभागीय आयुक्त संजीवकुमार जयस्वाल, जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी या कामाची सोमवारी पाहणी केली. गेवराईतील तलवाडय़ात सोळाव्या शतकातील त्वरितादेवी मंदिर, तसेच याच काळातील तलाव आहे. दुष्काळी स्थितीत कोरडाठाक पडलेल्या या तलावातील गाळ सामाजिक संघटनांनी काढला. तो किती हेक्टर जमिनीवर टाकण्यात आला, याची माहिती घेतली. या वेळी ग्रामस्थांशी चर्चा करून कामाबद्दल समाधान व्यक्त केले. बीडजवळ वंजारवाडी तलावही गाळमुक्त झाल्याचे पाहून मोबाईल फोटो घेतले. किती यंत्रांद्वारे काम पूर्ण झाले, यामुळे काय फायदा होणार आहे याची माहिती घेतली. उकडा तलावातील विहिरीच्या पाणलोट कामाची पाहणी केली. डोंगरकिन्हीत सक्करबाई मुंडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील जैन संघटनेच्या कार्यालयासही भेट दिली. संगणक कक्षात जाऊन कोणत्या तलावातून किती गाळ दररोज काढला, या साठी कोणते सॉफ्टवेअर विकसित केले आहे, याचीही माहिती घेतली.