कराड तालुक्यातील शिरगावची सुकन्या मोनिका तानाजी यादव या विद्यार्थिनीने कल्पकता, आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर  सौरऊर्जेवर चालणारी बहुउद्देशीय मोटारगाडी तयार करण्याची किमया करून दाखविली आहे. या बहुद्देशीय मोटारगाडीची दिल्लीत होणा-या राष्ट्रीय स्तरावरील ‘इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड’ अंतर्गत देशपातळीवरील पहिल्या २० उपकरणांत निवड झाली आहे. शिरगावच्या स्वातंत्र्यसैनिक गजाननराव बंडोजी पाटील विद्यानिकेतनची मोनिका ही गुणी विद्यार्थिनी आहे.
सौरऊर्जेवर चालणारी ही नावीन्यपूर्ण गाडी ग्रामीण भागातील शेतक-याच्या मुलीने साकारल्याने ही  मोटारगाडी व त्याची निर्माती मोनिका निश्चितच कौतुकास पात्र असल्याचे समाधन व्यक्त केले जात आहे. मोनिकाला ही सोलर मिनी फोरव्हिलर बनविण्यासाठी सूरज यादव, नीलेश कदम, अविराज लोहार या विद्यार्थ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. या सहका-यांबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक पी. डी. बिंदगे व विज्ञान शिक्षकांचे याकामी विशेष मार्गदर्शन लाभल्याने सौरऊर्जेवर चालणारी बहुउद्देशीय मोटारगाडी साकारण्याचा तिचा संकल्प पूर्णत्वास गेला आहे. इन्स्पायर अ‍ॅवॉर्ड स्पध्रेत ४६८ उपक्रमातून निवडक उपकरणात ही गाडी निवडली गेली. पुढे नुकत्याच झालेल्या सांगलीतील राज्यस्तरीय स्पध्रेतही मोनिकाच्या मोटारगाडीने बाजी मारून यशोशिखराकडे वेगाने वाटचाल केली आहे. ही पर्यावरणपूरक मोटारगाडी महाराष्ट्रातून अव्वल ठरली आहे. ही मोटार येत्या ८ ते १० ऑक्टोबर या तीन दिवसीय दिल्लीतील राष्ट्रीयस्तरावरील इन्स्पायर अ‍ॅवॉर्डसाठी निवडली गेल्याने मोनिका यादवबरोबरच तिला सहकार्य करणारे विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
शिरगावच्या स्वातंत्र्यसैनिक गजाननराव बंडोजी पाटील विद्यानिकेतनच्या मोनिका यादव बरोबरच अनेक हरहुन्नरी विद्यार्थी कलाकुसरता, ज्ञान-विज्ञान व तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने अनेक प्रयोग करताना दिसत आहेत. केवळ शिक्षणापुरतेच आपले जीवन नसल्याची उमेद या होतकरू विद्यार्थ्यांमध्ये दिसून येत आहे. मात्र, शिरगावला शिवाजीराव पाटील यांनी सुरू केलेली ही शाळा विनाअनुदानित आहे. तरीही विशेष म्हणजे अल्प मोबदल्यात ज्ञानदानाचे कार्य साधणा-या गुरुजनांकडून येथील विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला बळ दिले जात आहे. विविध उपक्रमांचा शोध घेत त्याची यशस्वी अंमलबजावणी होत आहे. त्यासाठी ते सातत्याने डोळसपणे प्रयत्नशील असल्याचे सुखद चित्र  आहे. इन्स्पायर अ‍ॅवॉर्डमधून त्याची प्रचिती आली. याच शाळेतील मोनिकाने हे नावीन्यपूर्ण संशोधन केले आहे.