बॉलिवूडमधील ‘खाना’वळींत किंवा नायिकांमध्ये स्पर्धा नेहमीच सुरू असते. चित्रपट निर्माते ‘खाना’वळीचे किंवा दोन बडय़ा नायिकांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित करण्याचे शक्यतो टाळतात. कारण यांच्यातील स्पर्धेचा त्यांना फायदा होण्याऐवजी तोटाच होण्याची जास्त शक्यता असते. मात्र बॉलिवूडचा ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन आणि तमिळ चित्रपटाचा अनभिषक्त ‘बॉस’ रजनीकांत यांचा ‘सामना’ आता लवकरच होणार आहे. या दोन अभिनय सम्राटांचे चित्रपट पुढील महिन्यात एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत.
बॉलिवूडमध्ये अमिताभ बच्चन तर तामिळ चित्रपटसृष्टीत रजनीकांत या नावांनंतर कानाच्या पाळीलाच हात लावला जातो. या दोघांना मायबाप प्रेक्षकांनी जे काही दिले त्याची तुलना जगभरात क्वचितच कोणाच्याही लोकप्रियतेशी करता येईल. सत्तरीत गेल्यानंतरही दोघेही तेवढेच लोकप्रिय आहेत. त्यांच्यानंतर किमान ३-४ पिढय़ांचे नायक- नायिका पडद्यावर आल्या. परंतु या दोघांचेही स्थान अबाधित राहिले आहे.
या अगोदर अमिताभ आणि रजनीकांत यांच्या अभिनयाची एकत्रित जुगलबंदी प्रेक्षकांना ‘अंधा कानून’ ‘गिरफ्तार’, ‘हम’, ‘दोस्ती दुश्मनी’ आदी चित्रपटातून पाहायला मिळाली होती. मात्र आता पुढील महिन्यात रूपेरी पडद्यावर वेगवेगळ्या दोन चित्रपटाच्या माध्यमातून या दोघांचा ‘सामना’ पुन्हा एकदा रंगणार आहे. अमिताभचा ‘भूतनाथ रिटर्न’ आणि रजनीकांतचा ‘कोचदियान’ हे नवे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत.
‘भूतनाथ रिटर्न’ काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘भूतनाथ’चा पुढील भाग (सिक्वेल) आहे. या चित्रपटात अमिताभसह बोमन इराणी, रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर रजनीकांत याच्या ‘कोचदियान’ या चित्रपटाचे खास वैशिष्ठय़ म्हणजे हा चित्रपट तमिळ भाषेसह एकाच वेळी हिंदी, मराठी, तेलुगू, भोजपुरी, बंगाली, पंजाबी आदी सात भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. चित्रपटात दिपिका पदुकोण, जॅकी श्रॉफ हे कलाकार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीकांतची मुलगी सौदर्या आर. अश्विन ही करत असून संगीत आर. रेहमानचे आहे.
सुमारे सात वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर अमिताभ आणि रजनीकांत या दोघांचे स्वतंत्र चित्रपट प्रदर्शित होत आहेत. या अगोदर २००७ मध्ये अमिताभचा ‘झूम बराबर झूम’ आणि रजनीकांतचा ‘शिवाजी द बॉस’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाले होते. आता ११ एप्रिल रोजी पुन्हा एकदा दोन अभिनय समाटांचा ‘सामना’ रूपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Mar 2014 रोजी प्रकाशित
सम्राटांचा सामना
बॉलिवूडचा ‘शहेनशहा’ अमिताभ बच्चन आणि तमिळ चित्रपटाचा अनभिषक्त ‘बॉस’ रजनीकांत यांचा ‘सामना’ आता लवकरच होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 06-03-2014 at 07:12 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kings battle