मकर संक्रांतीनिमित्ताने एकीकडे पतंगांचे उत्सव आकाशात रंगले असतानाच प्राणीमित्र संघटना पक्ष्यांना वाचवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांतील जनजागृतीमुळे मांजामुळे जखमी होणाऱ्या पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र तरीही संक्रांतीदरम्यानच्या पतंगोत्सवात शहरात शेकडो पक्षी जखमी होतात.
सूर्याच्या दक्षिणायणातून उत्तरायणाकडे सुरू होणाऱ्या प्रवासाचा उत्सव साजरा करताना पतंग उडवण्याच्या उत्सवाला मुंबईत भरभरून प्रतिसाद मिळतो. मात्र पतंगासाठी वापरण्यात येत असलेला मांजा पक्ष्यांसाठी कर्दनकाळ ठरतो. काचेचा चुरा लावलेल्या या मांजामध्ये अडकून शेकडो पक्षी जखमी होतात. काहींचे प्राण जातात. या पक्ष्यांमध्ये कबुतरे, कावळे यांच्यासोबत घारी, घुबड, चिमण्याही असतात. या पक्ष्यांना वाचवण्यासाठी मालाड येथील अिहसा ग्रुप, परळ येथील बीएसपीसीए (बॉम्बे सोसायटी फॉर द प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू एनिमल्स), प्लॅन्ट अॅण्ड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पीएडब्ल्यूएस) अशा पक्षीमित्र संस्था काम करत असतात. वैयक्तिक पातळीवरही अनेक पक्षीमित्र परिसरातील जखमी पक्ष्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करतात. अग्निशमन दलाकडूनही उंचावर अडकलेल्या पक्ष्यांना सोडवण्यासाठी मदत केली जाते. गेल्या वर्षी बीएसपीसीएने ६० पक्ष्यांवर उपचार केले होते. त्यात ४५ कबुतर, तीन घुबड व चार घारी होत्या. याशिवाय संस्थेच्या रुग्णवाहिकेने गेट वे ऑफ इंडिया, आझाद मैदान, गिरगाव चौपाटी या परिसरात १३७ पक्ष्यांची सुटका केली होती.
मांजामुळे पक्ष्यांवर येणाऱ्या संक्रांतीची जाणीव व्हावी यासाठी गेल्या वर्षी कांदिवली येथील जैन आराधक मंडळाने मृत पक्ष्यांची अंत्ययात्रा काढली होती. गेल्या काही वर्षांत जखमी पक्ष्यांच्या संख्येत घट होत असल्याचे पीएडब्ल्यूएसचे संस्थापक सुनीश कुंजू यांनी सांगितले. ठाणे ते घाटकोपर तसेच पवई या परिसरातील पक्षी सोडवण्यासाठी आमच्या संस्थेतील कार्यकर्ते मदत करतील, असेही कुंजू म्हणाले. या संस्थेने गेल्या वर्षी ८ कबुतरे आणि चार घारींना वाचवले होते. मोठय़ा प्रमाणावर पक्ष्यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात, पाणथळ जागांनजीक पतंग उडवू नयेत. मांजासाठी काचेचा चुरा लावलेला मांजा वापरणे टाळावे आणि जखमी पक्ष्यांना मदत करण्याचे आवाहन पक्षीमित्रांनी केले आहे.
वीजकंपन्यांचेही आवाहन
मांजाला लावण्यात येणारा धातूचा चुरा हा उत्तम वीजवाहक असल्याने उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांनजीक पतंग उडवू नयेत, असे आवाहन रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून करण्यात आले आहे. २२०,००० व्होल्ट इतक्या विजेच्या उच्च दाबाच्या वाहिन्यांच्या चुंबकीय क्षेत्रात मांजा आल्यास त्यामुळे जीवितहानी होण्याचा तसेच वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वच मुंबईकरांनी व विशेषत वर्सोवा, ओशिवरा, मालाड, गोरेगाव, विक्रोळी, चेंबूर या भागात पतंग उडवताना वीजवाहिन्यांपासून दूर राहण्याची खबरदारी घ्यावी. अपघात घडल्यास १८०० २०० ३०३० या २४ तास सुरू असलेल्या हेल्पलाइनवर संपर्क साधावा.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jan 2014 रोजी प्रकाशित
पतंगाचा मांजा, पक्ष्यांना सजा
मकर संक्रांतीनिमित्ताने एकीकडे पतंगांचे उत्सव आकाशात रंगले असतानाच प्राणीमित्र संघटना पक्ष्यांना वाचवण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

First published on: 11-01-2014 at 01:39 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kite flying in densely populated urban areas affecting birds