३ ते १३ मे दरम्यान आंबा महोत्सव
महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास संस्था यांच्यावतीने मे महिन्यात ‘कोकण आम्र पर्यटन’ आयोजन करण्यात आले आहे. कोकणच्या पर्यटनास चालना देण्यासाठी ५, १२, १९ मे रोजी प्रवाशांची गरज लक्षात घेऊन माफक दरात त्यांना सहलीचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे. या शिवाय, नाशिककरांना हापुस आंब्यांची लज्जत चाखता यावी म्हणून ३ ते १३ मे या कालावधीत आंबा महोत्सवाचेही आयोजन केले आहे.
या बाबतची माहिती प्रादेशिक व्यवस्थापक प्रज्ञा बडे-मिसाळ यांनी दिली. कोकण आम्र पर्यटनांतर्गत नेहमीच्या स्थळ दर्शनाबरोबर आंबा, काजु, फणस, करवंद या कोकण मेव्याचा यथेच्छ आस्वाद पर्यटकांना घेता येणार आहे. यासाठी कोकणातील शेतक ऱ्यांच्या आंबा बागेला भेट देणे, आंबे तोडुन खाणे तसेच आंबे काढण्यापासून त्याची प्रतवारी करून पेटय़ा भरणे ही संपूर्ण प्रक्रिया पाहता येणार आहे. पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ व कोकण पर्यटन विकास संस्था यांच्या सहकार्याने या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. सहलीत दापोली, हर्णे, मुरूड, कर्दे, गणपतीपुळे, पावस, हेदवी येथे पर्यटकांना सागरी स्नानाचा आनंद लुटता येईल. या शिवाय, पॅरासेलिंग, जेट स्की, बनाना राइड, बम्पर राईड या वॉटर स्पोर्ट्सची मजाही अनुभवता येणार आहे.  कोकण आम्र पर्यटनात ५, १२ व १९ मे या कालावधीत पाच दिवसांची सहल आयोजित करण्यात आली आहे. त्यात अधिकतम १०० पर्यटकांना संधी देण्यात येणार असून साध्या प्रवासाकरीता प्रती व्यक्ती नऊ हजार ५०० तर वातानुकुलितसाठी ११, ५०० रुपये आकारण्यात येणार आहे.
दरम्यान, कोकण पर्यटन विकास संस्थेच्यावतीने ३ ते १३ मे या कालावधीत कोकण आंबा महोत्सवचे आयोजन नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जुन्या मुख्यालयाच्या सभागृहात करण्यात आले आहे. त्यात कोकणातील ३५ शेतक ऱ्यांनी नोंदणी केली आहे. कोकणातील शेतक ऱ्यांच्या बागेतून थेट वाजवी दरात हापूस आंबे उपलब्ध होणार आहे. तसेच या महोत्सवात नाशिककरांना कोकणातील विविध पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ आणि कोकण पर्यटन विकास संस्था यांचे स्टॉल असतील. महोत्सव व पर्यटनाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन मिसाळ यांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी दत्ता भालेराव ९४२३९ ६८८६८ या क्रमांकावर संपर्क साधावा.