राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये कोल्हापुरातील १९ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. त्यांना उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, जिल्हा उपनिबंधक, सहाय्यक विक्रीकर आयुक्त, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक अशा पदांवर रूजू होण्याची संधी मिळाली आहे. अमरसिंह पाटील हा विद्यार्थी खेळाडू या संवर्गातून राज्यात प्रथम क्रमांकाने यशस्वी ठरला आहे. ते विक्रीकर अधिकारी बनले आहेत. कोल्हापूर जिल्ह्य़ातील विद्यार्थ्यांचे स्पर्धा-परीक्षांमध्ये उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर लागलेल्या निकालाने ही बाब अधोरेखित झाली आहे. कोल्हापुरात स्पर्धा-परीक्षांविषयी मार्गदर्शन करणाऱ्या नामांकित संस्था आहेत. तेथे शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसह सोलापूर, सांगली, सातारा, पुणे जिल्ह्य़ातील विद्यार्थीही अभ्यासासाठी येत असतात. स्पर्धा परीक्षेला पुरक वातावरण असल्याने त्यांची प्रगतीही जोमाने होत आहे. यावेळी १९ विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. त्यापैकी काहीजण सध्या वेगवेगळ्या पदावर शासकीय सेवेत आहेत.    कोल्हापुरातून यश प्राप्त केलेले विद्यार्थी याप्रमाणे. कंसात सेवेचे पद. अमरसिंह पाटील (विक्रीकर अधिकारी), शिवप्रताप खोत (वित्त अधिकारी वर्ग-१, राज्यात पाचवा), बजरंग देसाई (पोलीस उपअधीक्षक),सचिन घागरे व सचिन खलाल (उपजिल्हाधिकारी), महेश वाघमोडे (मुख्याधिकारी), सुरेश काशिद (तहसीलदार), सचिन आनंदराव पाटील (नायब तहसीलदार), प्रशांत बापूसाहेब शेळके (सहाय्यक निबंधक),मंदार मिलिंद जावळे (पोलीस उपअधीक्षक), सचिन माणिक सांगले (सहाय्यक विक्रीकर आयुक्त), मंगेश बाबासाहेब सूर्यवंशी (जिल्हा उपनिबंधक), नागनाथ शिवाप्पा कंजेरी (जिल्हा उपनिबंधक), दयानंद पाटील वरविकांत कांबळे (सहाय्यक विक्रीकर आयुक्त), शीतल पाटील (जिल्हा उपनिबंधक), प्रशांत शेळके (सहाय्यक निबंधक) या विद्यार्थ्यांना युनिक अ‍ॅकॅडमी, स्टडी सर्कल, नरके फौंडेशन व इचलकरंजीचे स्नेहबंध या संस्थांमध्ये मार्गदर्शन मिळाले.

प्रशिक्षण संस्थांचे दावे

यावेळी कोल्हापूर जिल्ह्य़ाचा निकाल उत्तम प्रकारे लागला असल्याने त्याचे श्रेय घेण्यासाठी प्रशिक्षण संस्था सरसावल्या आहेत. त्यातून दावे प्रतिदावे केले जात आहेत. बजरंग देसाई या पोलीस उपअधीक्षक झालेल्या उमेदवाराने आमच्या संस्थेचे मार्गदर्शन घेतले असा दावा तब्बल तीन संस्थांनी केला आहे. हिच बाब महेश वाघमोडे या मुख्याधिकारी पदावर गेलेल्या विद्यार्थ्यांबाबत झाली आहे. तीन संस्थांनी त्यांच्या बाबतीत असाच दावा केला आहे. त्यामुळे विद्यार्थी नेमक्या कोणत्या संस्थेचे असा गोंधळ निर्माण झाला आहे.