२६ कोटींच्या उपाययोजना केल्याचा दावाू
पावसाळ्यात काही ठिकाणी कोसळणाऱ्या दरडी आणि खचणारे मार्ग यामुळे कोकण रेल्वे विस्कळीत होऊ नये यासाठी यंदा तब्बल २६ कोटी रुपये खर्चून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या उपाययोजनांमुळे यंदाचा कोकण रेल्वेचा प्रवास पावसाळ्यातही सुरक्षित आणि सुरळीत असल्याची हमी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
कोकण रेल्वेमार्गाच्या जवळ रत्नागिरी आणि चिपळूण येथे दरडी कोसळण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर घडतात. पोमेंडी हे त्यातील प्रमुख ठिकाण. १९९९ ते २०१३ या काळात कोकण रेल्वेने सुमारे २९३ कोटी रुपये खर्च करून अनेक उपाययोजना करूनही कोकण रेल्वेचा मार्ग पावसाळ्यात निर्धोक नसतो. या पाश्र्वभूमीवर यंदा कोकण रेल्वेने २६ कोटी रुपये खर्चून विविध उपाययोजना केल्या असून सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाची हमी दिली आहे. पावसाळ्यात रेल्वेमार्ग निर्धोक राहावा यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना करणे आवश्यक आहे, हे सांगण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करून त्यांनी सुचविलेल्या उपायांनुसार ८७ ठिकाणी कामे करण्यात आली आहेत. त्यात संभाव्य दरडी कोसळण्याच्या ठिकाणी सुरक्षा भिंती उभारण्यात आल्या असून डोंगरकडे कापून हलके दगड काढून टाकणे, तेथे संरक्षक जाळ्या लावणे आदी कामे करण्यात आली आहेत.
निवसर येथे दोन वर्षे सलग पावसाळ्यात रेल्वे मार्ग खचला होता. त्यामुळे निवसर रेल्वे स्थानकापूर्वी मार्गात बदल करण्यात आला असून आता तेथे मार्ग खचणार नाही, असे सूत्रांनी सांगितले. रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूंना पाणी वाहून जाण्यासाठी नाले बांधण्यात आले आहेत.
बोगद्यांमध्ये भूस्खलन होऊ नये यासाठी काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त, बोगद्यांजवळ २४ तास गस्त, हवामान खात्याच्या स्थानिक कार्यालयाकडून पावसाची आगाऊ सूचना देण्यासाठी यंत्रणा, रत्नागिरी आणि कारवार येथे अतिरिक्त नियंत्रण कक्ष, पावसाळ्यामध्ये प्रत्येक विभागात खास दक्षता पथकाची गस्त, संभाव्य दरडी कोसळण्याच्या भागात सुरक्षा रक्षक तैनात ठेवणे आदी उपाययोजना कोकण रेल्वेने केल्या आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 11th Jun 2013 रोजी प्रकाशित
पावसाळ्यातही सुरळीत प्रवासाची कोकण रेल्वेकडून हमी
२६ कोटींच्या उपाययोजना केल्याचा दावाू पावसाळ्यात काही ठिकाणी कोसळणाऱ्या दरडी आणि खचणारे मार्ग यामुळे कोकण रेल्वे विस्कळीत होऊ नये यासाठी यंदा तब्बल २६ कोटी रुपये खर्चून उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 11-06-2013 at 08:34 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway gives the assurance of service in rainy season