कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेच्या नगरसेविका कोमल निग्रे यांना पालिकेचा सफाई कामगार आणि फेरीवाला पथकाचा प्रमुख दिलीप भंडारी याने धमकी दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
संगीतावाडी प्रभागातील भानुशाली रस्ता महापालिकेने फेरीवाल्यांसाठी राखीव ठेवला आहे. यामुळे येथे अनेक फेरीवाले व्यवसाय करतात. आरोपी दिलीप भंडारी या फेरीवाल्यांकडून अनधिकृतपणे पैसे गोळा करत असे.
तसेच पैसे गोळा करताना त्याच्याकडून सर्रासपणे आपल्या नावाचा वापर केला जात होता, असे नगरसेविका निग्रे यांनी सांगितले. याबाबत जाब विचारण्यासाठी आपण भंडारीला बोलविले असता तो आला नाही.या उलट रात्रीच्या वेळी त्यांनी आपल्या घरात घुसून ‘माझ्या वाटेला येऊ नका, तुम्हाला बघून घेईल’ या शब्दात धमकी दिल्याचे निग्रे यांनी सांगितले. पालिकेतील काही उच्चपदस्थ अधिकारी भंडारी याची पाठराखण करीत असल्याचा आरोपही निग्रे यांनी केला आहे. याबाबत भंडारीवर टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. येत्या काळात भंडारीच्या निलंबनाच्या मागणीसाठी मनसेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मनसेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले.