छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श समोर ठेवणारा मराठी तरुण उद्योगात यायला मागे पडतो. शिक्षणानंतर नोकरीत अडकून न पडता मराठी तरुणांनी उद्योगात आले पाहिजे. उद्योगासाठी भांडवल पाहिजे ही मानसिकता बदलली पाहिजे, ते बँकांकडून उभे करता येते फक्त इच्छाशक्ती हवी आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाण्याची व त्यावर मात करण्याची जिद्द ठेवावी, असा सल्ला यशस्वी मराठी उद्योजकांनी ‘लोकसत्ता’ पुरस्कृत ‘मी उद्योजक होणारच’ या कार्यक्रमात दिला.
‘बृहन्मुंबई वृत्तपत्र विक्रेता संघ’ आणि ‘परिवर्तन एक बदल, कर्तव्य फाऊंडेशन’ यांच्या साह्याने आणि ‘लोकसत्ता पुरस्कृत’ ‘मी उद्योजक होणारच पर्व ४’ हा कार्यक्रम विलेपार्ले येथील नवीनभाई सभागृहात पार पडला. या कार्यक्रमात ‘निर्माण ग्रुप’चे अध्यक्ष राजेंद्र सावंत, ‘क्रिस्टल समूहा’चे प्रमुख आणि ‘म्हाडा’च्या इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती प्रसाद लाड, ‘पितांबरी’चे अध्यक्ष रवींद्र प्रभूदेसाई, डॉ. पवन अग्रवाल, दरेकर समूहाचे अरुण दरेकर, ‘इंग्लिश बोल’चे अनिल कर्ता, डॉ. संतोष कामेरकर यांनी आपले अनुभव सांगितले.
उद्योजक होण्यासाठी कोणते गुण अंगी बाणवावेत, लक्ष्य कसे ठरवावे आणि ते साध्य करावे, नियोजन कसे करावे, महत्त्वाचे निर्णय घेताना काय काळजी घ्यावी, याबाबत वक्त्यांनी मार्गदर्शन केले. इंग्रजी बोलण्याची सवय कशी करता येईचा याचा मंत्रही यावेळी देण्यात आला.