उसाची उचल वेळेत करावी, थकीत वाहतूक बिले त्वरित द्यावीत, को २६५ ऊस स्वीकारावा आदी प्रमुख मागण्यांसाठी शेतकरी, वाहतूक कंत्राटदार यांनी दालमिया शुगर्स आसुर्ले-पोर्ले साखर कारखान्यावर मोर्चा काढला. शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेल्या कारखान्याच्या युनिट हेड गुरव यांच्यावर मळीमिश्रित पाण्याची बाटली फेकून आंदोलकाने राग व्यक्त केला. शेतकऱ्यांनी कारखान्याच्या वाहतूक गेटजवळ बैलगाडी आडवी लावून कारखाना दोन तास बंद ठेवला.
आसुर्ले-पार्ले येथील दत्त साखर (दालमिया शुगर) कारखाना अधिकारी आणि आसुर्ले-पोर्ले गावातील शेतकरी यात ऊसतोडणी कार्यक्रमावरून उडालेल्या संघर्षांवरून पन्हाळा पोलीस अधिकाऱ्यांच्या मधस्थीने चर्चेत अंतिम तोडगा निघाला.
 आसुर्ले-पोर्ले गावातील आठवडय़ातील बसपाळी बंद केली. दोन्ही गावात मकरसंक्रांतीनंतर ऊसतोडणी वाहतूक यंत्रणेत वाढ केली जाईल. को २६५ उसाची तोडणी थांबविली जाणार नाही. तसेच तोडणी, ओढणीचे बिल वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून खात्यावर वर्ग केले जाईल. या मागण्या मान्य केल्यानंतर शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.
दालमिया शुगरने हा कारखाना हंगामाच्या तोंडावर खरेदी केला. त्यामुळे पाळीपत्रकात ऊसनोंद चुकीची झाली आहे, असा थेट आरोप केला. दालमियांचे शेती अधिकारी स्थानिक उसाला कवडीमोल किंमत देऊन गेटकेनचा उसाला अधिक प्राधान्य देत आहेत. या कारखान्याला दोन्ही गावच्या शेतकऱ्यांच्या जमिनी दिल्या असताना कंपनी येथील शेतकऱ्याना अरेरावीची वागणूक का देतात, असा सवाल आंदोलकांनी केला. आंदोलनचे जि.प. सदस्य प्रकाश पाटील, परशराम खुडे, पृथ्वीराज सरनोबत, करण सरनोबत, पिटू पाटील, रामराव चेचर, शामराव माळी, सुरेश शेलार, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राहल पाटील, शिवसेनेचे कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते.