‘प्रपोझल’ या नाटकातील आपल्या भूमिकेसाठी यंदाच्या बहुतांश पुरस्कारांवर आपला दावा सांगणाऱ्या अदिती सारंगधरसमोर सध्या लग्नाचे ‘प्रपोझल’ आले आहे. विशेष म्हणजे तिने या प्रस्तावाचा जोरात विचार केला असून येत्या मे महिन्यात ती ‘लग्नाच्या बेडी’त अडकणार आहे. एका संकेतस्थळासाठी दिलेल्या मुलाखतीत अदितीने आपण लवकरच लग्न करत असल्याची गोड बातमी दिली. गेली चार वर्षे अदिती ज्या मुलाच्या प्रेमात आहे, त्याच्याबरोबरच ती लग्न करणार आहे.
या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये अदितीने आपल्या नात्याच्या सुरुवातीबद्दलची एक आठवण सांगितली. अदितीचा ‘सोल मेट’ हा चित्रपटसृष्टीतला नाही. या दोघांची भेट झाली ती त्यांच्या मित्रमैत्रिणींमुळे! त्या वेळी पहिल्याच भेटीत प्रेम वगैरे असे काहीच घडले नाही. आम्ही भेटत गेलो आणि ओळख वाढत गेली. एक दिवस तो मला लाँग ड्राइव्हला लोणावळ्याला घेऊन गेला. येताना आम्ही दोघे ‘सीसीडी’मध्ये थांबलो. त्या वेळी त्याने अगदी फिल्मी पद्धतीने माझ्या बोटात अंगठी वगैरे घालून मला प्रेमाबद्दल विचारले, असे अदितीने मुलाखतीत म्हटले आहे.
याबाबत अदितीकडे विचारणा केली असता तिने आपण मे महिन्यात लग्न करत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अदितीने तारखेबद्दल काहीच वाच्यता केली नसली, तरी २० मे रोजी ती लग्नाच्या बंधनात अडकणार असल्याचे कळते. तिचा होणारा नवरा हा चित्रपटसृष्टीशी संबंधित नाही. चार वर्षे एकत्र काढल्यानंतर आमच्या नात्यात एक समजूतदारपणा आला. लग्नसंस्थेवर माझा विश्वास असल्याने लग्न करायलाच हवे, या मताची मी आहे, असे अदिती म्हणाली. ‘प्रपोझल’मधील अदितीच्या अभिनयाची जोरदार चर्चा सुरू असतानाच ‘आकांत’मधील तिच्या भूमिकेचीही वाहवा होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marriage proposal in front of aditi