मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने प्रतिवर्षी कविवर्य कुसुमाग्रज काव्य पुरस्कार, नटवर्य लोटू पाटील नाटय़पुरस्कार व यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार देण्यात येतात. कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार प्रा. वसंत पाटणकर यांना, नटवर्य लोटू पाटील पुरस्कार चंद्रकांत कुळकर्णी यांना, तर यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रा. शेषराव मोरे यांना यंदाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले.
तिन्ही पुरस्कारार्थीची नावे मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव पाटील यांनी बुधवारी जाहीर केली. डॉ. दादा गोरे, कुंडलिक अतकरे व श्याम देशपांडे या वेळी उपस्थित होते. डॉ. सुधीर रसाळ, प्रा. बाळकृष्ण कवठेकर व अनुराधा पाटील यांच्या समितीतर्फे ही निवड करण्यात आली. ११ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार २७ फेब्रुवारीला कुसुमाग्रजांच्या जन्मदिवशी प्रदान करण्यात येईल. नटवर्य लोटू पाटील व यशवंतराव चव्हाण पुरस्कार १६ मार्च रोजी देण्यात येणार आहे.
प्रा. पाटणकर हे १९८० च्या दशकातील कवी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. ते काव्यसमीक्षकही आहेत. ‘कविता : संकल्पना, निर्मिती आणि समीक्षा (१९९५), ‘साहित्यशास्त्र : स्वरूप आणि समीक्षा (२००७) आणि कवितेचा शोध (२०११) हे त्यांचे महत्त्वाचे ग्रंथ आहेत. याशिवाय सात ग्रंथ त्यांनी संपादित केले. पैकी तीन काव्यसमीक्षा आणि कविता यांच्याशी संबंधित आहेत. राज्य सरकारसह अनेक संस्थांचे वाङ्मय पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. १९८० मध्ये ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या ‘कविता दशकाची’ या संग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश केला होता.
चंद्रकांत कुळकर्णी गेली २५ वर्षे रंगभूमी-चित्रपट क्षेत्रांशी संबंधित आहेत. प्रसिद्ध रंगकर्मी व प्रतिभाशाली दिग्दर्शक म्हणून महाराष्ट्राला ते परिचित आहेत. वेगवेगळ्या आकृतिबंधाची व निरनिराळ्या नाटककारांची ६० पेक्षा अधिक मराठी नाटके त्यांनी दिग्दर्शित केली. चारचौघी, वाडा चिरेबंदी, डॉक्टर, तुम्हीसुद्धा! गांधी विरुद्ध गांधी, हमिदाबाईची कोठी इत्यादी नाटकांचे व ‘भेट’, ‘तुकाराम’, ‘कदाचित’ या चित्रपटांचे दिग्दर्शनही त्यांनी केले आहे.
प्रा. मोरे अभियांत्रिकी पदवीधर असून ऐतिहासिक साधनांची व पुराव्यांची कठोर चिकित्सा करून निर्भीडपणे इतिहासाची मांडणी करणारे इतिहासकार व विचारवंत म्हणून प्रसिद्ध आहेत. एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध व विसाव्या शतकाचा पूर्वार्ध हा शंभर वर्षांचा कालखंड त्यांच्या अभ्यासाचा व चिंतनाचा आस्थाविषय आहे. १८५७ चा जिहाद, मुस्लीम मनाचा शोध, काश्मीर : एक शापित नंदनवन, सावरकरांच्या समाजक्रांतीचे अंतरंग आदी ग्रंथ प्रा. मोरे यांच्या नावावर आहेत. गेल्या वर्षी प्रसिद्ध झालेला ‘काँग्रेसने आणि गांधीजींनी अखंड भारत का नाकारला?’ हा ग्रंथ बराच गाजला.