गणित हा बहुतांश विद्यार्थ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आणणारा विषय मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायचा कसा, याचे धडे नुकतेच विद्याविहार येथील ‘सोमैय्या शाळे’ने भरविलेल्या ‘मॅथेमॅजिका’ या गणिती जत्रेत देण्यात आले. लहान मुलांबरोबरच पालकांनीही या जत्रेत भरलेल्या खेळांची गंमत लुटली. महत्त्वाची बाब म्हणजे शाळेच्या सुमारे १५० च्यावर वर्गातील विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत आपल्या ‘ज्युनिअर्स’साठी हे मनोरंजक व हसतखेळत गणित शिकविणारे खेळ तयार केले होते.
आपल्याकडे बहुतेक वेळा गणित हा विषय अत्यंत नीरस व कंटाळवाण्या पद्धतीने शिकविला जातो. त्यामुळे गणित म्हटले की मुलांना भीतीच वाटते. पण या गणिती जत्रेत अनेक गणिती संकल्पना सोप्या पद्धतीने खेळाच्या माध्यमातून मुलांना समजावून सांगण्यात आल्या.
उदाहरणार्थ ‘फॉम्र्युला रेस’ खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राण्यांच्या वेगावरून अंतर, वेळ आणि गतीची आकडेमोड समजली. ‘फीडिंग फ्रेन्झी’ या खेळातून दहा, शंभर, हजार यासारखे आकडे तयार करण्यासाठी आवश्यक संख्येविषयी माहिती मिळाली. ‘आयडेंटिटी फॉम्र्युला’ने विद्यार्थ्यांना समीकरणांची निर्मिती कशी होते हे शिकविले. या जत्रेत विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश होता. शिशुवर्गापासून सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून येथील खेळ आखले गेले होते. अधिकाधिक खेळ जिंकणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे दिली जात होती.
मॅथेमॅजिका या उपक्रमाचा उद्देश मुलांमध्ये गणिताबद्दल आवड व उत्कंठा वाढविणे होता. या विषयाविषयीचे गैरसमज व भीती निघण्यास यामुळे निश्चितच मदत झाली. गणितातील अनेक मूलभूत बाबी समजून घेता आल्या.
तसेच गणिताचे दैनंदिन जीवनातील महत्त्वही आम्हाला समजावून द्यायचे होते, अशी प्रतिक्रिया शाळेच्या प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी सांगितले. तर जेव्हा एखादी संज्ञा किंवा पाठ शिकताना त्यात मजा, प्रयोगशीलता यांचा अंतर्भाव केला जातो, तेव्हा त्या विद्यार्थ्यांसाठी तो अनुभव आयुष्यभरासाठी लक्षात राहतो, असे शाळेच्या मुख्याध्यापिका कविता वैद्य यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Nov 2014 रोजी प्रकाशित
गणित मनोरंजक झाले
गणित हा बहुतांश विद्यार्थ्यांच्या पोटात भीतीचा गोळा आणणारा विषय मनोरंजक पद्धतीने विद्यार्थ्यांना शिकवायचा कसा, याचे धडे नुकतेच विद्याविहार येथील ‘सोमैय्या शाळे’ने भरविलेल्या ‘मॅथेमॅजिका’
First published on: 25-11-2014 at 06:20 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mathemagica maths fair