जिल्ह्यातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक-शिक्षकेतर सेनेची सहविचार सभा शिक्षणाधिकारी नवनाथ औताडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी दुपारी १२ वाजता येथील स्काऊट व गाइड कार्यालयात होणार आहे.
या सभेस वसंत गिते, उत्तम ढिकले, नितीन भोसले हे आमदार उपस्थित राहणार आहेत. सभेत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षण सेवक यांच्या मान्यतेविषयी, भविष्य निर्वाह निधी, वैद्यकीय बील, फरक बील, दरमहा एक तारखेला वेतन मिळणे, कनिष्ठ महाविद्यालयीन तासिका तत्त्वावरील फरक बील, सेवाज्येष्ठता यादी, एकस्तर वेतनश्रेणी, दरमहा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पगारांचे दाखले मिळणे, विद्यार्थी पटपडताळणी अशा सर्वच प्रश्नांवर चर्चा करण्यात येणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असेल, अशा कर्मचाऱ्यांनीही सभेस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सभेस संघटनेचे प्रदेश सरचिटणीस प्रकाश सोनवणे, सहसरचिटणीस प्रकाश रकिबे, राज्य सचिव दशरथ जारस, जिल्हाध्यक्ष के. के. अहिरे आदी उपस्थित राहणार आहेत.