घराच्या ताब्यासाठी दोन वर्षे प्रतीक्षा केल्यानंतर २०११ व २०१२ च्या सोडतीमधील ‘म्हाडा’च्या प्रतीक्षा नगर येथील लाभार्थ्यांना घराचा ताबा मिळण्याचा मार्ग नुकताच मोकळा झाला. त्याचबरोबर प्रतीक्षा नगरच्या घरांसाठीचा देखभाल खर्चही निश्चित करण्यात आला असून तो दरमहा २६२० रुपये इतका माफक ठेवण्यात आला आहे. या सोडतीमधील इतर ठिकाणच्या घरांसाठी जवळपास दुप्पट देखभाल खर्चाचा भरुदड पडला असताना प्रतीक्षा नगरच्या रहिवाशांना मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. ‘म्हाडा’ने २०११ मध्ये ४०३४ घरांसाठी सोडत काढली होती. मागच्या वर्षी ‘म्हाडा’ने याच सोडतीमधील अल्प उत्पन्न गटातील मालवणी येथील सुमारे २३५० घरांसाठी अडीच लाख रुपये वाढीव घेण्याचा निर्णय घेतला होता. सोडतीत मालवणीमध्ये घर मिळालेल्यांना घराची रक्कम अडीच लाखांनी वाढवून जोरदार आर्थिक दणका दिल्यानंतर आता या घरांचा ताबा घेत असताना या घरांचा देखभाल दुरुस्तीचा खर्च पाहून अर्जदारांचे डोळे पांढरे झाले.   एरवी या घरांचा देखभाल खर्च सुमारे २५०० ते तीन हजार रुपयांच्या आसपास असतो. पण आता ‘म्हाडा’च्या नव्या गणितानुसार या लाभार्थ्यांना सुमारे साडेपाच हजार रुपये दरमहा मोजावे लागणार आहेत. तर उच्च उत्पन गटातील घरांसाठी  पावणे सात हजार रुपये द्यावे लागतील.  यामुळे प्रतीक्षा नगर योजनेतील १९६ लाभार्थ्यांना   देखभाल खर्चाचा किती भरुदड पडणार अशी भीती वाटत होती. पण   त्यांना आता दिलासा मिळाला आहे.  २०१२ च्या सोडतीमधील सुमारे ८४ लाभार्थ्यांनाही हा दिलासा मिळाला आहे.