ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाईंदर शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या मुंबई-नाशिक महामर्गावरील हायवे-दिवा येथील स्टेम पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून मंगळवारी लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. त्यामुळे या तिन्ही शहरांवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची चिन्हे  आहेत.
ठाणे जिल्ह्य़ात १५ टक्के पाणीकपात लागू करण्यात आली असून त्यामुळे शहरांचा पाणीपुरवठा आठवडय़ातून एकदा बंद ठेवण्यात येतो. असे असतानाच ठाणे, भिवंडी आणि मीरा-भाईंदर या शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या हायवे-दिवा येथील स्टेम पाइपलाइनच्या व्हॉल्वमधून मंगळवारी लाखो लिटर पाणी वाया गेले असून परिसरातील शेतामध्ये हे पाणी साचले आहे.
मात्र, या बाबत संबंधित विभाग अधिकाऱ्यांना गंधवार्ताच नव्हती. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर संबंधित विभागाने घटनास्थळी धाव घेतली असून तातडीने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.