टोल आकारणीबाबत सार्वमत घेण्याची भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर पाठोपाठ मनसेने टोल रद्द करण्यासाठी जिल्हाभर सह्य़ांची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी मध्यवर्ती बसस्थानकासमोर या मोहिमेला सुरुवात होणार आहे.
टोल आकारणीच्या प्रश्नावर शिवसेना आक्रमक आहे, असा उल्लेख करून शिवसेनेच्या उपनेत्या आमदार नीलम गोऱ्हे यांनी शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत टोलप्रश्नी जनतेचे मतदान शिवसेना घेणार असल्याचे घोषित केले होते. शिवसेनेने आपली चळवळविषयक भूमिका स्पष्ट केल्यानंतर आता मनसेनेही या प्रश्नामध्ये उडी घेतली आहे. त्यासाठी सह्य़ांची मोहीम राबविण्याचे या पक्षाने ठरविले आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेटून कोणत्याही परिस्थितीत टोल रद्द करायला लावणार असल्याचे मनसेने पत्रकात म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना भेटण्यापूर्वी टोल आकारणीस जनतेचा विरोध किती प्रमाणात आहे, हे स्पष्ट होण्यासाठी सह्य़ांची मोहीम राबविली जाणार आहे. याकरिता संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पुढाकार घेतला आहे. या निर्णयाचे नियोजन करण्यासाठी शनिवारी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. जिल्हाध्यक्ष अभिजित साळोखे, राजू गोरे, शहराध्यक्ष राजू दिंडोर्ले, जिल्हा सचिव प्रसाद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, गजानन जाधव, दौलत पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Jun 2013 रोजी प्रकाशित
टोल विरोधात मनसेची सह्य़ांची मोहीम
टोल आकारणीबाबत सार्वमत घेण्याची भूमिका शिवसेनेने घेतल्यानंतर पाठोपाठ मनसेने टोल रद्द करण्यासाठी जिल्हाभर सह्य़ांची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
First published on: 02-06-2013 at 01:32 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mnss sign campaign against toll