अपघातातील जखमीला नुकसानभरपाई म्हणून १ लाख ३७ हजार रुपये साडेसात टक्के व्याजासह देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने बसचालक प्रकाश नाईकवाडे व एस.टी. महामंडळास दिला. बसची दुचाकीला धडक बसून दुचाकीवरील मुलाला कायमचे अपंगत्व आले. या मुलास ही भरपाई द्यावी, असा आदेश आहे.
कैलास श्रीधर शिरसाठ व त्यांचा मुलगा हृषीकेश (शिरसगाव, तालुका गंगापूर) हे दोघे गंगापूरहून शिरसगाव रस्त्याने दुचाकीवरून (एमएच २० एव्ही ३१५२) शिरसगावकडे जात होते. अंबेगाव शिवारात लासूर स्टेशनकडून गंगापूरकडे जात असलेल्या बसच्या (एमएच २० डी ४७१८) चालकाने भरधाव गाडी चालवून दुचाकीला धडक दिली. या अपघातात शिरसाठ पिता-पुत्र दोघेही जखमी झाले. अपघातात हृषीकेशला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात व नंतर शहरातील सिटी केअर सुपरस्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात हृषीकेशला कायमचे अपंगत्व आले. दि. ३ एप्रिल २०१० या दिवशी संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला होता. गंगापूर पोलिसांनी अपघाताबाबत बसचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. जखमी हृषीकेश याने अॅड. संदीप बी. राजेभोसले व अॅड. छाया घाटे यांच्यामार्फत मोटार अपघात न्यायाधिकरणाकडे अपघातातील  नुकसानभरपाईसाठी दावा दाखल केला होता. बसचालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात होऊन हृषीकेशला अपंगत्व आल्याचा युक्तिवाद अॅड. राजेभोसले यांनी केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून बसचालक व महामंडळ यांनी हृषीकेश याला १ लाख ३७ हजार रुपये साडेसात टक्के व्याजाने दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून द्यावेत, असा आदेश न्यायाधिकरणाने दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Motor accident tribunal order