सोनसाखळी चोरी आणि भुरटय़ा चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे पोलीस त्रस्त झाले आहेत. त्यामुळे आता हे प्रकार रोखण्यासाठी पोलीस खऱ्या अर्थाने रस्त्यावर उतरले आहेत. म्हणजे पोलिसांनी आता रस्त्यावर उतरून जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. हातात मेगाफोन घेऊन पोलीस नाक्यानाक्यांवर फिरून अशा भुरटय़ा चोरांपासून सावध कसे राहावे याबाबत मार्गदर्शन करत आहेत.
मुंबई पोलिसांची सगळ्यात मोठी डोकेदुखी म्हणजे दररोज होणाऱ्या सोनसाखळ्यांची चोरी. ताज्या आकडेवारीनुसार मुंबईत दररोज ४ ते ५ सोनसाखळी चोरीच्या घटना घडत आहेत. मोटारसायकलीवरून येऊन रस्त्यावरून चालणाऱ्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी, मंगळसूत्र अवघ्या काही सेकंदांत मारले जाते. वाढत्या सोनसाखळीच्या घटनांमुळे महिला वर्गात भीतीचे आणि पोलिसांविरोधात संतापाचे वातावरण आहे. सोनसाखळी चोरीचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिसांनी अनेक उपाय योजले आहेत. त्यात गस्ती वाढवणे, सोनसाखळी चोरीच्या ठरावीक ठिकाणी बंदोबस्त ठेवणे, सोनसाखळी चोरांना मोक्का लावणे, जागोजागी सीसीटीव्ही बसवणे आदी उपायांचा समावेश आहे. मात्र तरीसुद्धा हे प्रमाण कमी झालेले नव्हते. त्यामुळे महिलांनाच जर काय काळजी घ्यावी याची माहिती दिली तर सोनसाखळी चोरी रोखता येऊ शकेल, अशी संकल्पना आयुक्त राकेश मारिया यांनी मांडली आणि त्याप्रमाणे पोलीस ठाण्यांना जनजागृतीचे आदेश दिले. या महिन्यापासून हे जनजागृती अभियान सुरू झाले आहे. खुद्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक रस्त्यावर फिरून सर्तकतेच्या सूचना देत असल्याने नागरिकही कुतूहलाने लक्ष देऊन ते ऐकत असतात.
या अभियानाअंतर्गत दररोज संध्याकाळी गर्दीच्या ठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक आपली गाडी घेऊन जातात. हातात मेगाफोन घेऊन ते नागरिकांना कशा पद्धतीने सतर्क राहावे याच्या सूचना देतात. याबाबत बोलताना टिळक नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भागवत सोनावणे यांनी सांगितले की, या मोहिमेला आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळतोय. महिलांनी शक्यतो पदपथावरून आणि उजव्या बाजूने चालावे. त्यामुळे समोरून मोटारसायकलवरून येऊन कुणी सोनसाखळी चोरू शकणार नाही. नेहमी पदराने अंगावरील दागिने झाकून ठेवावेत. लग्न समारंभात जाताना दागिने पर्समध्ये ठेवावे. मॉर्निग वॉक (प्रभात फेरी), सकाळी देवळात जाताना दागिने घालू नये अशा पद्धतीच्या सूचना आम्ही देतो.
अनेकदा घरी दागिने पॉलिश करण्यासाठी काही लोक येतात आणि हातचलाखीने असली दागिने लंपास करून तेथे नकली दागिने ठेवतात. त्यामुळे नामांकित सराफांच्या दुकानातच जावे, असेही त्यांनी सांगितले.
सोनसाखळी चोरी रोखण्याच्या सूचनेबरोबरच वरिष्ठ नागरिकांना फसवणुकीपासून कसे सावध राहावे याच्याही सूचना दिल्या जात आहेत. त्यानुसार बँकेतून पैसे काढल्यावर अनोळखी व्यक्तींच्या हाती पैसे मोजण्यास देऊ नये, एटीएममध्ये वृद्ध नागरिकांना पैसे काढण्यास एकटय़ाने पाठवू नयेत आदी सूचनाही केल्या जातात. गेल्या महिन्यात आमच्या हद्दीत ८ सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या होत्या; परंतु जनजागृती मोहिमेमुळे त्याचे प्रमाण चालू महिन्यात कमी झाल्याचे सोनावणे यांनी सांगितले.