‘म्हाडा’च्या घरांची सोडत म्हणजे अर्जदारांचीच नव्हे तर मुंबईत घर असावे अशी इच्छा असलेल्या साऱ्यांचीच उत्कंठा शिगेला पोहोचलेली असते. त्यामुळे सोडतीच्या वेळी सभागृहात प्रचंड गर्दी आणि प्रत्येक निकालागणिक आशा-निराशेचे हिंदोळे आणि त्यानुसार उमटणारे चित्कार हे पूर्वीचे नेहमीचे चित्र. पण आता हे चित्र पालटले आहे. शुक्रवारी ‘म्हाडा’च्या घरांच्या सोडतीवेळी गर्दी होणे तर दूरच; उलट सभागृह जवळपास ७० टक्के रिकामेच राहिले. त्यामुळे मुंबईकरांना ‘म्हाडा’च्या घरांमध्ये रस असला तरी सोडतीसाठी पायपीट करण्यात रस उरलेला नाही असेच दिसून येत आहे. ‘म्हाडा’च्या मुंबईतील १,२४४ घरांसाठी शुक्रवारी रंगशारदा सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत दोन सत्रांमध्ये ही सोडत पार पडली. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष सतीश गवई, मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी निरंजनकुमार सुधांशू आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी हजर होते.  यावर्षी १,२४४ घरांसाठी अर्ज ९३,५५९ अर्ज आले पैकी ५,९१२ अर्ज बाद ठरल्याने ८७,६४७ अर्जदार ‘म्हाडा’च्या सोडतीसाठी स्पर्धेत उरले होते. सोडतीसाठी सभागृहाबाहेरही मांडव टाकण्यात आला होता. तेथे स्क्रीनची व्यवस्थाही करण्यात आली होती. पण मुळातच सभागृहातील दोन तृतीयांश खुच्र्या रिकाम्या असल्याने मांडवातही तुरळक हजेरी होती. रिकाम्या खुच्र्या व त्यामुळे निकालानंतर अपवादानेच हजर असलेले विजेते यामुळे सोडत थंड वातावरणात सुरू होती. या अशा निर्जीव सोडतीत सूत्रसंचालक म्हणून सूत्रे हाती घेणारे ‘म्हाडा’चे दक्षता अधिकारी रामराव पवार यांनी वेळोवेळी समर्पक शेरोशायरी ऐकवत रंगत आणली.  ‘चिराग बुझे तो जुगुनू आफताब हुए, जिसे ना पूछा किसी ने वो कामयाब हुए’ असे सांगत त्यांनी घर जिंकणाऱ्या सर्वसामान्यांच्या यशाचे वर्णन केले. घर जिंकल्यानंतर भावना व्यक्त करताना सर्वच विजेत्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. संरक्षण दलातील निवृत्त कर्मचारी किरण निकम यांना तर अश्रू अनावर झाले.
लॉटरीचा नवीन निकाल घोषित होत असताना ढोलताषे आणि तुतारी वाजवत सभागृहात उत्साह आणण्याचा प्रयत्न म्हाडाकडून केला जात होता. मात्र, सभागृहात फारशी गर्दीच नसल्याने या कल्पकतेला तसाच उत्साही प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत उपस्थित इच्छुक काही दिसत नव्हते.
आनंद तर झालाच..
* शंतनू गंगणे (कलावंत) –
तुळजापूरहून मुंबईत आल्यानंतर गेल्या सात वर्षांपासून कलाक्षेत्रात उमेदवारी करत असताना दरवर्षी मुंबईत आपले हक्काचे घर असावे यासाठी ‘म्हाडा’चा अर्ज भरण्याचा विचार करायचो. पण या ना त्या कारणाने राहून जायचे. यावेळी अर्ज करायचाच असे ठरवले. त्यानुसार पवईतील मध्यम उत्पन्न गटातील घरासाठी अर्ज केला आणि पहिल्याच प्रयत्नात घर मिळाले. खूप खूप आनंद होत आहे. आता घरासाठी पैसे उभे करायचे आहेत. त्यामुळे खूप मेहनत करावी लागेल. अर्थात मेहनतीला फळही मिळेलच.

* किरण निकम (माजी सैनिक) – मी २१ वर्षे हवाईदलात काम करून देशाची सेवा केली. त्याचेच फळ म्हणून आता मला ‘म्हाडा’चे घर मिळाले आहे. मुंबईत खासगी बिल्डरचे घर घेणे परवडणारे नव्हते व अंधेरीत भाडेतत्त्वावर राहत असल्याने ‘म्हाडा’चे मुंबईतील घर मिळावे यासाठी गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न करत होतो. गेल्यावर्षीच्या सोडतीत तर अनेक योजनांमध्ये अर्ज केला. पण एकातही यश आले नाही. आता मात्र उच्च उत्पन्न गटातील गोराईतील घर मिळाले आहे. खूप आनंद झाला आहे.

* डी.डी. महाजन (म्हाडा कर्मचारी) – ‘म्हाडा’त सात-आठ वर्षांपासून काम करत आहे. दरवर्षी अर्ज करत होतो. पण नशिबाने यावेळी साथ दिली. बऱ्याच वर्षांच्या प्रयत्नानंतर का होईना पण आता हक्काचे घर मुंबईत मिळाले आहे याचा आनंद आहे.

* नारायण मुदलीयार – मी एका खासगी कंपनीत काम करतो. मालकाने सांगितले की ‘म्हाडा’ची जाहिरात आली आहे. तुही प्रयत्न कर. त्यांच्या सांगण्यावरूनच अर्ज भरला आणि सोडतीत हक्काचे घर मिळाले.