जयताळा येथील मैदानात मंगळवारी पहाटेपूर्वी दोघांनी एका तरुणाचा दगडाने डोके ठेचून खून केला. प्रतापनगर पोलिसांनी याप्रकरणी दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे. विक्की उर्फ सूरज अशोक उमाळे (रा. रमाबाई नगर जयताळा) हे खून झालेल्या तरुणाचे नाव असून तो हिंगणा औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीत मजुरी करीत होता.
कामावरून तो काल सायंकाळी घरी परत आला. रात्री त्याच्या दोघा मित्रांनी त्याला बोलावल्याने तो गेला. मध्यरात्र झाली तरी तो घरी परत न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्याच्या मोबाईलवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळत नव्हता. जवळच्या जयताळा बाजार मैदानात एक मृतदेह पडला असल्याचे समजल्याने तेथे गेल्यावर तो विक्कीचा मृतदेह असल्याचे उघड झाले. या घटनेने त्याच्या कुटुंबीयांना धक्काच बसला. तेथे वस्तीतील लोक गोळा झाले. खून झाल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रतापनगर पोलीस तेथे पोहोचले. पोलिसांनी घटनास्थळाचे निरीक्षण केले. मृत तरुणाचे डोके दगडाने ठेचले होते. जवळच मोबाईल पडला होता.
पोलिसांनी तपास सुरू केला. देवेंद्र उर्फ भुऱ्या व राकेश उर्फ लाल्या हे दोन आरोपी त्याच्यासोबत होते. रात्री त्यांनी सोबत मद्यप्राशन केले. त्यानंतर कुठल्याशा कारणावरून आरोपींनी विक्कीला मारहाण केली आणि दगडाने ठेचून खून केला, असे पोलिसांना समजले.
विक्कीच्या वडिलांच्या तक्रारीवरून प्रतापनगर पोलिसांनी देवेंद्र उर्फ भुऱ्या व राकेश उर्फ लाल्या या दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. दुपापर्यंत दोन संशयिताना पोलिसांनी ताबत घेतले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व नागपूर वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Murdered of man on groung in jaytala