दिल्लीतील बलात्कार घटनेच्या निषेधार्थ सोलापुरातील रयत शिक्षण संकुलाच्या लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शुक्रवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा नेला. बलात्कारासाठी गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी मोर्चेकरी विद्यार्थिनींच्या शिष्टमंडळाने केली.
सम्राट चौकातील रयत शिक्षण संस्था संचालित लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालयात सध्या स्त्री-पुरुष समानतेची बिजे रुजविण्यासाठी ‘जागर-जााणिवांचा’ अभियान सुरू असतानाच दिल्लीत धावत्या बसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार, त्यानंतर वार्ताकन करणाऱ्या महिला पत्रकारांची झालेली छेडछाड, नागपूर, सिलीगुडी, मुंबईसह देशाच्या कानाकोपऱ्यात होत असलेल्या महिला अत्याचाराच्या घटनांमुळे महाविद्यालयीन विद्यार्थिनीमध्ये संताप व्यक्त होत आहे. हीच प्रतिक्रिया शासनाकडे पोहोचण्यासाठी मूकमोर्चा काढण्यात आला.
या मूकमोच्र्याच्या प्रारंभी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यास प्राचार्य डॉ. राजीव बावधनकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. सम्राट चौक, बुधवार पेठ, पांजरापोळ चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा पुतळा, पार्क चौक, सिध्देश्वर मंदिरमार्गे हा मूकमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. विद्यापीठ प्रतिनिधी पूजा सुपाते व प्राचार्य डॉ. बावधनकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी पराग सोमण यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. प्रा. संतोष राजगुरू, अनुराधा पाटील, अश्विनी एकबोटे, प्रियांका हिरेमठ, अर्चना पाटील, प्रणाली बाळस्वरूप, शुभांगी झिंझुर्डे, राणी वनकस्तुरे, मनीषा गायकवाड, अश्विनी खताळ, प्रियांका सर्वगोड, अश्विनी शिंदे, प्रा. सुमन केंद्रे, प्रा. धनश्री तुपकर यांच्यासह ४५० विद्यार्थिनींचा या मूकमोच्र्यात सहभाग होता.